Join us

मुंबईत जम्मू-काश्मीरच्या मेकॅनिककडून 15 किलो चरस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 4:22 AM

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत १५ किलो चरस विकण्याचा डाव अमली पदार्थ विरोधी पथकाने उधळून लावला. या प्रकरणी जम्मू-काश्मीरच्या मेकॅनिकला बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत १५ किलो चरस विकण्याचा डाव अमली पदार्थ विरोधी पथकाने उधळून लावला. या प्रकरणी जम्मू-काश्मीरच्या मेकॅनिकला बेड्या ठोकल्या आहेत. इश्फाक अहमद मोहम्मद अशरफ रेशी (२३) असे अटक तस्कराचे नाव असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.मालाड पूर्वेकडील दिंडोशी बस स्थानकाजवळ चरस विक्रीचा व्यवहार सुरू असल्याची माहिती कांदिवलीच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला आणि इश्फाकला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत ६० लाख रुपये किमतीचा १५ किलो चरस आढळून आला. पोलिसांनी तो ताब्यात घेत इश्फाकला अटक केली. हा चरस गणेश विसर्जनाच्या गर्दीसह मुंबईतल्या बड्या उच्चभ्रू वसाहती, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये विकला जाणार होता, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.