मुंबई : दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी मुंबईतील जान मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालियालाही ब्रिज आणि रेल्वे ट्रॅक उडविण्याचे प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर येत आहे. अनिस इब्राहिमच्या निर्देशावर जान मोहम्मद याला पाकिस्तानमधून मोहम्मद रहिमुद्दीन एका कॉलिंग ॲपद्वारे सर्व निर्देश देत असल्याचे दिल्ली पोलिसांकडून समजले. याबाबत दिल्ली पोलीस, एटीएस अधिक तपास करीत आहेत.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जानसह ओसामा ऊर्फ सेमी, मूलचंद ऊर्फ संजू उर्फ लाला, झिशान कमर, मोहम्मद अबुबकर, मोहम्मद आमिर जावेद या सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. यासाठी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले ओसामा आणि जिशान बॉम्बस्फोट घडविण्यासाठी लोकांना तयार करीत होते. त्यासाठी दोन ते अडीच किलो आरडीएक्सही त्यांनी मिळविले होते. यात मुंबईतील अनिस इब्राहिमचा जवळचा हस्तगत जान हा या अतिरेक्यांना लागणाऱ्या पैशांपासून ते इतर सर्व साहित्य पोहोचवत होता.
या दहशतवादी हल्ल्याची तयारी सहा महिन्यांपासून सुरू होती. मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये स्फोट घडवण्याची तयारी सुरू होती. पाकिस्तान आणि आयएसआय यासाठी दाऊदच्या गँगची मदत घेत होती. पाकिस्तानी लष्कराच्या जब्बार आणि हमजा या दोन अधिकाऱ्यांनी ओसामा आणि झिशानसह इतर सोळा जणांना घातपाताचे ट्रेनिंग दिले; तर ओसामा आणि झिशानने लोकांची नियुक्तीसुद्धा सुरू केली होती. या सर्वांच्या मागे पाकिस्तानमध्ये बसलेला त्यांचा हँडलर मूळचा मुंबईतला मोहम्मद रहिमुद्दीन ऊर्फ बिट्टू आहे. मोहम्मद रहिमुद्दीन हा आधी अंडरवर्ल्ड गँगस्टर होता जो दाऊदसाठी काम करायचा. दाऊदने त्याला आधी दुबई आणि नंतर पाकिस्तानमध्ये बोलावले. पाकिस्तानमध्ये बसून बिट्टू मुंबईसह देशामध्ये अतिरेकी घातपात घडून आणण्यासाठी तरुणांना सोबत जोडण्याचे काम करतो. त्यानेच जान आणि झिशानला यात जोडल्याची माहिती समोर येत आहे.
जानने तयार केलेल्या साखळीचा शोध
जानचे मित्रही यात जोडले असल्याच्या शक्यतेतून त्याच्या मित्राकडे एटीएस अधिक चौकशी करीत आहेत. जानने मुंबईत तयार केलेल्या साखळीचा शोध घेण्यात येत आहेत. दिल्लीत दाखल झालेले एटीएस आणि गुन्हे शाखेचे पथक दिल्ली पोलिसांच्या मदतीने अधिक तपास करीत आहेत. काही मित्र एटीएसच्या ताब्यात असल्याचेही समजते आहे.
...