लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ११ ते १४ मे दरम्यान फसवे विज्ञानविरोधी जनजागरण या ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या समाजात विज्ञानाच्या नावाने अनेक अशास्त्रीय प्रकार सुरू आहेत, त्यामुळे आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांवर होणारे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर सोसावे लागत आहेत. या फसव्या विज्ञानविरोधातील लढाया हा अंनिसचा पुढील अजेंडा असणार आहे. ११ मे रोजी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या छद्मविज्ञानविरोधी विशेषांकाचे प्रकाशन आयसर, पुणे येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सत्यजित रथ यांच्या हस्ते होणार आहे. १२ मे रोजी छद्मविज्ञानाचे अभ्यासक प.रा. आर्डे हे ‘फसव्या विज्ञानाचा ऑक्टोपस’ या विषयावर बोलणार आहेत. १३ मे रोजी वाई येथील सुप्रसिद्ध स्रीरोगतज्ज्ञ व विज्ञानलेखक डॉ. शंतनू अभ्यंकर हे ‘फसव्या उपचारांचे मायाजाल’ या विषयावर मत मांडतील, तर १४ मे रोजी मनोविकारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांच्या भाषणाने या व्याख्यानमालेचा समारोप होईल. ही सर्व व्याख्याने दररोज सायंकाळी ५ वाजता झूम आणि फेसबुक पेजवर होतील.
............................