मुंबई : राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील माता मृत्यू व अर्भक मृत्यूंचे प्रमाण कमी करणे आणि या महिलांच्या आरोग्य संस्थेत प्रसुतीच्या प्रमाणात वाढ करणे हे जननी सुरक्षा योजनेचे उद्दिष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना कार्यान्वित असून, याचा फायदा गरीब घरातील मातांना होत आहे. पात्र मातेला ६०० रुपये बॅंक खात्यामध्ये जमा केले जातात.
गरीब आणि ग्रामीण भागातील गरोदर महिलांना प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीदरम्यान मदत मिळावी, या हेतूने जेएसवाय कार्यान्वित केली आहे. जेएसवाय कार्ड सर्व आवश्यक माहिती भरून लाभार्थीस देणे. प्रसुतीपूर्व तीन तपासण्या, धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण व लोहयुक्त गोळ्या मिळवून देणे अथवा मदत करणे, लाभार्थीला शासकीय आरोग्य संस्थेत किंवा शासन मानांकित खासगी आरोग्य संस्थेत प्रसुतीकरिता प्रवृत्त करणे. लाभार्थीला बॅंकेत खाते उघडून घेण्यासाठी मदत करणे, या गोष्टींचा समावेश आहे.
सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था-
ग्रामीण भागात - उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा स्त्री रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि जननी सुरक्षा योजनेकरिता मानांकित केलेली खासगी रुग्णालये.
शहरी भागात - वैद्यकीय महाविद्यालये, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्रे, नागरी कुटुंबकल्याण केंद्रे व त्यांच्याकडील इतर रुग्णालये आणि शासन अनुदानित रुग्णालये.
पात्र मातांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून नियमित प्रयत्न होत असतात. काहीवेळा त्यांच्याकडे कागदपत्रे नसतात, त्यावेळी आमची अडचण होते. या योजनेमुळे पात्र मातांना फायदा होतो. त्यांच्या आरोग्याची सर्व काळजी याठिकाणी घेतली जाते.- डॉ. तुषार पालवे, अधीक्षक, कामा रुग्णालय.
मातांना दिले जाणारे लाभ-
१) ग्रामीण भागातील जेएसवाय पात्र मातेची जर शासकीय आरोग्य संस्था / मानांकित खासगी आरोग्य संस्थेत प्रसुती झाली तर तिला प्रसुतीच्या तारखेनंतर ७ दिवसांच्या आत ७०० रुपये बँक खात्यामध्ये परस्पर जमा होणाऱ्या धनादेशाद्वारे लाभ दिला जातो.
२) शहरी भागातील संस्थेत प्रसुती झाली तर तिला प्रसुतीच्या तारखेनंतर ७ दिवसांच्या आत ६०० रुपये बँक खात्यामध्ये परस्पर जमा होणाऱ्या धनादेशाद्वारे लाभ दिला जातो.
३) ग्रामीण व शहरी भागातील फक्त दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्यांची प्रसुती घरी झाल्यास अशा लाभार्थ्यांला ५०० रुपये प्रसुतीच्या तारखेनंतर ७ दिवसांच्या आत बँक खात्यामध्ये परस्पर जमा होणाऱ्या धनादेशाद्वारे लाभ दिला जातो.