लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरूवारी सुरुवात झाली. यात्रेदरम्यान राणे यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. राज्यातील जनता महाविकास आघाडीला कंटाळली आहे, असे सांगतानाच शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केले, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून राणे यांनी यात्रेला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी प्रवीण दरेकर, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर, सुनील राणे यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यात्रेदरम्यान खरेवाडी, नायगाव, सायन, चेंबूर आदी ठिकाणी राणे यांनी उपस्थितांना संबोधितही केले. मागील ३० वर्षात सिंगापूर, बँकाॅक अशा शहरांनी मोठी प्रगती केली. ३२ वर्षे मुंबईची सत्ता शिवसेनेकडे आहे. या काळात मुंबई सगळी बकाल करून टाकली. दक्षिण मुंबईतील लोकांना पैसा कसा खर्च करायचा, हा प्रश्न पडतो. तर, दुसरीकडे लालबाग, परळसह पुढे उपनगरातील लोकांना, कष्टकरी माणसाला खायची भ्रांत आहे. अनेक सामान्य शिवसैनिकांची हीच हालत आहे. ही परिस्थिती कुणी निर्माण केली, असा प्रश्न करतानाच मुंबईकरांचा विकास झाला नाही. मात्र, मातोश्रीचा विकास झाला. मातोश्रीमध्ये एकाचे दोन बंगले तयार झाले, असा टोलाही राणे यांनी लगावला.
कोरोनाच्या औषधातही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला. कोरोनाची साथ आल्यानंतर मुंबईत किती तरी लोकांचे मृत्यू झाले. शिवसेनेने औषधांमध्ये भ्रष्टाचार केला, असे सांगतानाच योग्यवेळी हे सारे प्रकरण बाहेर काढेन, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्र्यांनी साथ दिली पाहिजे - राणे
माझ्याकडे केंद्रातील जे खाते आहे त्याचा उपयोग करून मी महाराष्ट्रात उद्योग, व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला यात साथ दिली पाहिजे. करून दाखवायची माझ्यामध्ये धमक आहे. कोकणात किती विकास केला आहे बघा, असेही राणे यावेळी म्हणाले.
३२ वर्षांचा पापाचा घडा भरणार
मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक भाजपच जिंकणार. शिवसेनेच्या ३२ वर्षांचा पापाचा घडा भरणार आहे. मुंबई महापालिका जिंकणे, हीच माझी जबाबदारी आहे. फडणवीस, दरेकर अशा सगळ्यांवरच ही जबाबदारी आहे. पण, मुंबई महापालिका आम्ही जिंकणारच आणि त्यासाठी मी मुंबईभर फिरणार असल्याचेही राणे यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही सांगावे - देवेंद्र फडणवीस
कोरोना, गर्दीबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली चिंता खरी आहे. पण, गर्दी करू नका, हे त्यांनी आधी त्यांच्या सहकारी काँग्रेस, राष्ट्रवादीला सांगावे. शिवसेनेलाही सांगावे. आम्हाला ब्रह्मज्ञान आणि ते कोरडे पाषाण अशी स्थिती आहे. आमच्या यात्रांना मिळणार प्रतिसाद पाहून विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळेच गुन्हे दाखल करणे, पोलिसांकरवी दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.