Join us  

जान्हवी गडकरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची ९ वर्षांनी मागणी; भरधाव ऑडीमुळे गेला दोघांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 10:40 AM

२०१५ साली अपघातात दोघांचा बळी घेणाऱ्या जान्हवी गडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची सरकारची मागणी

Drunk-And-Drive Accident 2015: बहुचर्चित ‘ईस्टर्न फ्री वे’ अपघातातील आरोपी जान्हवी गडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. २०१५ साली मद्यधुंद अवस्थेत, चुकीच्या बाजूने भरधाव ऑडी कार चालवून कॉर्पोरेट वकील जान्हवी गडकर यांनी दोन जणांचा बळी घेतला होता. दोन महिने तुरुंगात काढल्यानंतर गडकर यांना जामीन मिळाला. मात्र आता राज्य सरकारने जान्हवी गडकरवर हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता गडकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

जान्हवी गडकर यांच्या ऑडी कारने टॅक्सीला धडक दिली होती, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. गडकर यांनी आपली कार इस्टर्न फ्रीवेच्या चुकीच्या बाजूने सुमारे ११ किलोमीटर चालवली होती. ९ जून २०१५ च्या रात्री दक्षिण मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये कथितपणे मद्य प्राशन केल्यानंतर जान्हवी गडकर यांनी टॅक्सीला धडक दिली होती. ज्यामुळे ड्रायव्हर आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला आणि टॅक्सीमध्ये बसलेल्या चार जणांना गंभीर दुखापत झाली.

दुसऱ्याच दिवशी गडकर यांना आरसीएफ पोलिसांनी अटक केली. जान्हवी गडकर यांच्यावर आधीच्या आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यात हत्या, हेतुपुरस्सर दुखापत करणे किंवा गंभीर दुखापत करणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे यांचा समावेश होता. मात्र आता विशेष सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी सोमवारी न्यायालयाला आयपीसी कलम ३०२ लागू करण्यावर युक्तिवाद करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली आहे. कारण जान्हवी गडकर वकील असल्याने त्यांना हे चांगले ठाऊक होते की अंमली पदार्थांचे व्यसन करून वाहन चालवणे हा गुन्हा आहे. तरीही त्यांनी तसे केले. त्यामुळे त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करुन खटला चालवला जावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर तब्बल ५७ दिवस जान्हवी गडकर अटकेत होत्या. त्यावेळी कोर्टाने जान्हवी यांना ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र आता या प्रकरणात सरकारी वकिलांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन खटला चालवण्याची मागणी केली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार आहे. 

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीसगुन्हेगारीमहाराष्ट्र सरकार