जान्हवी गडकरला मिळाला जामीन
By admin | Published: August 6, 2015 02:03 AM2015-08-06T02:03:19+5:302015-08-06T02:03:19+5:30
बहुचर्चित ‘ईस्टर्न फ्री वे’ अपघातातील आरोपी जान्हवी गडकर (३५) या कॉर्पोरेट वकील तरुणीला बुधवारी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. अपघात झाल्यानंतर तब्बल
मुंबई : बहुचर्चित ‘ईस्टर्न फ्री वे’ अपघातातील आरोपी जान्हवी गडकर (३५) या कॉर्पोरेट वकील तरुणीला बुधवारी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. अपघात झाल्यानंतर तब्बल ५७ दिवस ती अटकेत होती. यापैकी बहुतांश दिवस तिला भायखळा येथील महिला कारागृहात काढावे लागले. न्यायालयाच्या आदेशानंतर संध्याकाळी जान्हवी घरी गेली.
९ जूनच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास जान्हवीने दारूच्या नशेत फ्री वेवर समोरून येणाऱ्या एका टॅक्सीला धडक दिली होती. या अपघातात टॅक्सीचालकासह दोघे जागीच ठार झाले, तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी १० जूनला पहाटे जान्हवीला गजाआड केले होते.
जान्हवीची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर तिने दोन वेळा कुर्ला दंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज सादर केले. न्यायालयाने दोन्ही अर्ज फेटाळले. त्यानंतर तिने सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. येथेही आरसीएफ पोलिसांनी तिला जामीन देऊ नका, अशी भूमिका घेतली.
हा तिचा पहिला अपघात नव्हे. याआधीही तिने अपघात केले आहेत. त्यामुळे जामीन दिल्यास अपघाताची पुनरावृत्ती होऊ शकेल, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली. तसेच आरोपी पेशाने वकील असून उच्चशिक्षित आहे.
त्यामुळे पुरावे नष्ट करू शकेल, साक्षीदारांवर दबाव आणू शकेल किंवा देशाबाहेर पसार होऊ शकेल, अशी शक्यताही पोलिसांनी न्यायालयासमोर ठेवली होती. तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केलेला आहे. विविध यंत्रणांकडून आवश्यक असलेले सर्व अहवाल पोलिसांना प्राप्त झालेले आहेत. अपघातातील जखमींनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, असा बचाव जान्हवीने आपल्या वकिलामार्फत केला. न्या. संजय व्ही. पाटील यांनी दोन्ही बाजू ऐकून जान्हवीला ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला.