इगोकडून जान्हवीला मिळाली मर्सिडिज, कंत्राटदाराला १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 08:27 AM2024-06-10T08:27:51+5:302024-06-10T08:29:56+5:30

Ghatkopar Hoarding Collapse : रेल्वे पोलिसांना ४०० टक्के अधिक नफ्याचे आमिष दाखवत इगो प्रायव्हेट लिमिटेडच्या माजी संचालिका जान्हवी मराठेने घाटकोपर होर्डिंगचे कंत्राट मिळविल्याचे तपासात समोर आले. अनेक महत्वाच्या पत्रव्यवहारात मराठेच्या स्वाक्षऱ्या असलेली कागदपत्रे विशेष  तपास पथकाच्या हाती लागल्या आहेत.

Janhvi Marathe gets Mercedes from Ego, contractor remanded in police custody till June 15 | इगोकडून जान्हवीला मिळाली मर्सिडिज, कंत्राटदाराला १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी

इगोकडून जान्हवीला मिळाली मर्सिडिज, कंत्राटदाराला १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी

 मुंबई - रेल्वे पोलिसांना ४०० टक्के अधिक नफ्याचे आमिष दाखवत इगो प्रायव्हेट लिमिटेडच्या माजी संचालिका जान्हवी मराठेने घाटकोपर होर्डिंगचे कंत्राट मिळविल्याचे तपासात समोर आले. अनेक महत्वाच्या पत्रव्यवहारात मराठेच्या स्वाक्षऱ्या असलेली कागदपत्रे विशेष  तपास पथकाच्या हाती लागल्या आहेत. याच कार्यकाळात इगोकडून त्यांच्या खात्यात ३३ लाख ५० हजार रुपये व मर्सिडिज दिल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. 

होर्डिंग दुर्घटनेनंतर पसार झालेल्या जान्हवी मराठे (४१) आणि कंत्राटदार सागर कुंभार (३६) या दोघांना गोव्याच्या एका हॉटेलमधून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. रविवारी दोघांना सुटीकालीन न्यायालयाने १५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात यापूर्वी इगोचा संचालक भावेश  भिंडे आणि स्ट्रक्चरल ऑडिटर मनोज संघू या दोघांना अटक केली होती. एसआयटीने केलेल्या तपासात,  ५ सप्टेंबर २०१६ ते २१ डिसेंबर २०२३ पर्यंत इगो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालिका होती. होर्डिंगच्या मंजुरीपासून ते उभारणीपर्यंत ती कार्यरत होती. होर्डिंगसाठी ९ नोव्हेंबर २२ रोजी तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्तांना केलेल्या पत्रव्यवहारात तिची स्वाक्षरी आहे. रेल्वेला जास्तीचा फायदा करून देण्याचे आमिष दाखवत परवानगी मिळविली.

१९ डिसेंबर २०२२ रोजी  तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्तांना केलेल्या पत्रात १० वर्षांच्या परवानगीसाठी स्वमर्जीने त्यात होर्डिंगचा आकार १२० बाय १४० बाय २ फूट नमूद केल्याचे पत्रही एसआयटीच्या हाती लागले आहे. आतापर्यंतच्या तपासात जान्हवीच्या दोन बँक खात्यात ३३ लाख ५० हजार रुपये दिल्याचे समोर आले. तसेच, तिला कंपनीने मर्सिडिज दिली होती. त्याचे हप्ते कंपनीच भरत आहे. संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतरही मर्सिडिज तिच्याकडेच होती. त्यामुळे आर्थिक फायद्यासाठी नियमांचे उल्लंघन करून अवाढव्य होर्डिंग उभारल्याचे तपासात समोर आले. 

वेगवेगळ्या नावाची आधारकार्ड
गुन्हे शाखेने जान्हवीकडून मोबाईल फोन, वेगवेगळ्या नावाची आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, आरसी बुक, एटीएम कार्ड असा ऐवज जप्त केला आहे, तर सागरकडून चार मोबाईल फोनसह २९ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, एटीएम कार्ड जप्त केले आहे.

Web Title: Janhvi Marathe gets Mercedes from Ego, contractor remanded in police custody till June 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.