मुरुड : लांबच लांब सागरकिनारा, अथांग समुद्र, रुपेरी वाळू, नारळपोफळीच्या बागा आदींसह निसर्गाची मुक्त उधळण केलेल्या मुरुडमध्ये वीकेंडला पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली आहे. ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यात शनिवारी हजारांच्या संख्येत पर्यटकांनी हजेरी लावली असून, राजापुरीत शेकडो वाहनांचा ताफा वाहनतळाच्या आश्रयाला होता.जंजिरा जलवाहतूक संस्थेकडे मेरीटाइम बोर्डाकडून ठेका मिळाला आहे. शिडाच्या बोटीतून लाटांचे तरंग व समुद्राची सैर अनुभवण्यासाठी हौशी पर्यटकांची झुंबड दिसून येते. वास्तुकलेचा अजोड नमुना असलेला जंजिरा किल्ला २२ एकर परिसरात विस्तारलेला आहे. समुद्राचे पाणी खारे असले तरी किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत. तटबंदीवर कलाबांगडी, लांडा कासमसारख्या पंचधातूच्या तोफा आजही इतिहासाची साक्ष देतात. किल्ल्यात पायाभूत सुविधांची वानवा असली तरी पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जलवाहतूक सेवा कार्यरत असते. वर्षाअखेर पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)सरकारतर्फे गडकिल्ल्यांच्या संवधर्नासाठी प्रतिवर्षी पॅकेज जाहीर केले जाते; परंतु ऐतिहासिक जलदुर्गासाठी निधी उपलब्ध झालेला नाही. किल्ल्याचे गतवैभव, राजमहाल, भुयारी मार्ग, रसद, तोफखाना खुष्कीचा दरवाजा आदींची वस्तुनिष्ठ माहिती प्रशिक्षित गाइड्सकडून मिळत नसल्याचे खंत इतिहासप्रेमी पर्यटक व्यक्त करतात.
वीकेंडसाठी पर्यटकांची जंजिरा किल्ल्याला पसंती
By admin | Published: December 13, 2015 12:15 AM