मुंबई - कोरोनाच्या फैलावामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले मुंबई आणि उपनगरातील लोकलसेवेचे दरवाजे अखेर सर्वसामान्यांसाठी उघडण्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. सरत्या वर्षात नसली तरी येत्या १ जानेवारीपासून मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात येईल, असे विधान राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली मुंबईची लोकलसेवा टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात येत आहे. सुरुवातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर घटस्थापनेपासून महिलांनाही मुंबईच्या उपनगरीय लोकलचे दरवाजे उघडले होते. मात्र दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवली गेली होती. त्या पार्श्वभूमीवर लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता.गेल्या पंधरवड्यात मुंबई आणि परिसरातील रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकलसेवेबाबत माहिती देताना सांगितले की, मुंबई आणि राज्यातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता आता जवळपास मावळली आहे. त्यामुळे आता लोकलसेवा सुरू होण्यामध्ये काही अडथळे आहेत असे वाटत नाही. आता अजून काही दिवस जातील. पण ३१ डिसेंबरनंतर जानेवारीमध्ये जानेवारीच्या १ तारखेपासून मुंबईतील लोकलसेवा सुरू होऊ शकते.दरम्यान, मुंबईतील लोकलसेवा ही डिसेंबरमध्ये सुरू होणार नाही. लोकलसेवा सुरू करण्याबाबतचा निर्णय हा जानेवारीच्या सुरुवातीला घेतला जाईल, असे विधान मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
या तारखेपासून मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी होणार खुली, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले संकेत
By बाळकृष्ण परब | Published: December 15, 2020 1:14 PM