22 जानेवारीला सुट्टी नाकारली; सावित्रीच्या लेकींचं आव्हाडांकडून कौतुक, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 09:17 AM2024-01-21T09:17:58+5:302024-01-21T09:20:15+5:30
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी प्रभू श्रीराम यांच्या आहाराबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.
मुंबई - देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर सोहळ्याच्या लोकार्पणाची उत्सुकता आहे. गावागावात रामभक्तांचा उत्साह दिसत असून अयोध्या नगरी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सजली आहे. केंद्र आणि राज्य सरकारनेही या सोहळ्यात सक्रीय सहभाग घेत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने देशभरात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही राज्यात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. मात्र, एका शाळेतील विद्यार्थीनींनी, आम्ही सावित्रीच्या लेकी, ज्योतिबाची लेकरं, आम्हाला सुट्टी नको, असे म्हणत ही सुट्टी नाकारली. त्यानंतर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियातून या मुलीचं कौतुक केलंय.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी प्रभू श्रीराम यांच्या आहाराबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर, त्यांनी स्पष्टीकरणही दिलं. त्यामुळे, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सर्वत्र उत्साह असताना आव्हाड हे त्यांच्या विधानांमुळे चांगलेच चर्चेत आहे. त्यातच, राज्य सरकारने २२ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर केली असता, ज्या शाळेनं ही सुट्टी नाकारली त्यांचं आव्हाड यांनी ट्विटरवरुन कौतुक केलंय. प्रख्यात नृत्यांगना आणि 'स्मितालय'च्या अध्यक्षा झेलम परांजपे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत आपल्या शाळेतील विद्यार्थिनींनी घेतलेला सुट्टी नाकारण्याचा निर्णय सर्वांगिण केला.
२२ जानेवारी रोजी देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यातच, महाराष्ट्र सरकारनेही मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यादिवशीच सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली, त्यामुळे सर्वांचा उत्साह डबल झाला आहे. मात्र, नृत्यांगणा झेलम परांजपे अध्यक्षा असलेल्या शाळेतील विद्यार्थिनींनी ही सुट्टी नाकारली आहे. त्यासंदर्भात, त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली.
"आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जोतिबांची लेकरं.....सरकारी GR शेवटच्या क्षणी येवो की खूप आधी येवो, आम्हाला राम प्राण प्रतिष्ठेची सुट्टी नको. रामलला सुद्धा खुश नाही होणार आमचा अभ्यास बुडला तर.... आमच्या अध्यक्षा झेलम ताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार...." असं त्यांनी लिहिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी लाईक आणि कमेंट करुन समर्थन दिलंय. तर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सावित्रीच्या लेकी म्हणत या विद्यार्थीनींचं कौतुक केलंय.
''या सावित्रीच्या लेकींचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. श्रीरामाला कुणीच नाकारत नाही. पण, राम हा भक्तीचा बाजार मांडण्याचा नाही, राम आस्थेचा विषय आहे. झेलम परांजपे तुम्ही घेतलेल्या कणकर भूमिकेसाठी तुमचं खूप खूप कौतुक!'', असे आव्हाड यांनी ट्विटवरुन म्हटले आहे.
दरम्यान, गुरुवारी मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लांची मूर्ती आसनावर स्थानापन्न करण्यात आली. आता या मूर्तीची पहिली झलक समोर आली आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी ५१ इंच उंची असलेली प्रभू रामचंद्रांची मूर्ती साकारली आहे.