जपानने महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करावी - पर्यटनमंत्री जयकुमार रावल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 08:07 PM2017-08-28T20:07:24+5:302017-08-28T20:11:16+5:30
जपानने महाराष्ट्रातील पर्यटन,पायाभूत सुविधा निर्मिती, तंत्रज्ञान, स्मार्ट सिटी आदी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी जपानमधील वाकायामा शासनाच्या शिष्टमंडळाला केले.
मुंबई, दि. 28 - जपानने महाराष्ट्रातील पर्यटन,पायाभूत सुविधा निर्मिती, तंत्रज्ञान, स्मार्ट सिटी आदी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी जपानमधील वाकायामा शासनाच्या शिष्टमंडळाला केले.
जपानमधील वाकायामा शासनाच्या शिष्टमंडळाने सोमवारी पर्यटनमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व वाकायामा शासनाच्या आंतरराष्ट्रीय नियोजन विभागाचे महासंचालक हिरोयुकी त्सुई यांनी केले. शिष्टमंडळात ओनीशी तात्सुनोरी, काझुओ यामासाकी, मसाकी शिमीझु,इतारु ताकाहाशी, हिडेकाझु हिराई, श्रीमती चिनात्सु साकामोटो, युमी नाकामोटो, ताईको मिनामी यांचा समावेश होता. तर, महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, पर्यटन विभागाचे सह सचिव दिनेश दळवी, एमटीडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, उप महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आदी उपस्थित होते.
जानेवारी 2018 मध्ये वाकायामाचे गव्हर्नर भारतामध्ये तसेच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्या अनुषंगाने विविध सामंजस्य करार होणार आहेत. या सामंजस्य करारामध्ये पर्यटन क्षेत्रातील वृद्धी, नाशिक शहराच्या अनुषंगाने शेती तसेच अन्न प्रक्रिया उद्योग, मेक इन महाराष्ट्रला चालना देण्यासाठी जपानचे योगदान, राज्यातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक, स्मार्ट सिटी प्रकल्प, विद्यार्थी आदान- प्रदान योजना आदींबाबत करार व्हावेत, अशी अपेक्षा जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केली.
हिरोयुकी त्सुई यांनी महाराष्ट्र दौऱ्यात मिळालेल्या अगत्याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला. विद्यार्थी आदान- प्रदान तसेच ज्ञान आदान प्रदान हा दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. तसेच वाकायामा गव्हर्नर यांच्या दौऱ्यात राज्य शासनाकडील विविध क्षेत्रांच्या अपेक्षासंदर्भात चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळात शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असल्याने त्यांचे पुणे तसेच मुंबईतील शाळांना दिलेल्या भेटीसंदर्भातील, तेथील शिक्षण पद्धतीविषयीचे अनुभवांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांना पर्यटनमंत्र्यांनी हिमरु शाल तसेच अजिंठा लेण्यातील छायाचित्रांच्या फोटो कॉपीज भेट दिल्या.