आता भांडुपमध्ये उभे राहणार जपानी गार्डन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 02:27 AM2019-02-20T02:27:02+5:302019-02-20T02:27:34+5:30
भांडुपमध्ये ९५७० चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड मनोरंजन मैदानासाठी आरक्षित आहे. त्यानुसार या ठिकाणी उद्यान तयार करण्यात येणार आहे.
मुंबई : भांडुपमध्ये मनोरंजन मैदानासाठी आरक्षित भूखंडावर लवकरच जपानी गार्डन उभारण्यात येणार आहे. यामध्ये जपानी हिरवळ, रंगीबेरंगी झाडे, पदपथ आणि अद्ययावत सुविधांचा समावेश असणार आहे.
भांडुपमध्ये ९५७० चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड मनोरंजन मैदानासाठी आरक्षित आहे. त्यानुसार या ठिकाणी उद्यान तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी मे. के. के. थोरात या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक भिंत, जपानी शैलीनुसार प्रवेशद्वार, चालण्यासाठी पदपथ, गजेबो, जपानी पद्धतीची हिरवळ आणि वृक्ष सौंदर्यीकरण असे हे उद्यान असणार आहे.
यामुळे बाधित झालेल्या ४० ते ५० वर्षे या जागेवर वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांचे पर्यायी जागेत पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी पात्र-अपात्र निश्चित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पात्र रहिवाशांचे पर्यायी जागेत पुनर्वसन केले जाणार आहे. चार एकर जागेवर होणाºया या उद्यानासाठी पालिका ५ कोटी २४ लाख रुपये खर्च करणार आहे.