मुंबई : तळ्यात नुकतीच उमललेली कमळाची फुले, अधूनमधून दिसणारा जपानी कोय मासा आणि तळ्याच्या काठावर असणारी बांबूची छोटी बेटे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. याच तळ्याच्या एका काठावरून दुसºया काठावर जाण्यासाठी असणारी खडकांची पायवाट, त्याच्याकडेला खांबावर लावलेल्या जपानी दिव्यांसह जपानी लाकडी पूल. जपानमधल्या ‘योकोहामा’ शहराशी थेट नाते असणाऱ्या या वाटिकेत जपानी पद्धतीच्याच दरवाजातून प्रवेश करताच समोर दिसणारे हे तळे मुंबईकरांना आजही भुरळ पाडत आहे. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालातील या वाटिकेला येत्या शुक्रवारी ३५ वर्षे पूर्ण होत आहेत.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या मध्यभागी सुमारे २१ हजार ८५१ चौरस फूट आकाराच्या भूखंडावर एक मनमोहक जपानी वाटिका सन १९८५-८६ मध्ये विकसित करण्यात आली.जपानमधील ‘योकोहामा’ महानगर परिषदेचे तत्कालीन महापौर मिचीकाझु सायगो यांनी योकोहामा व मुंबई शहरांच्या मैत्रीचे व स्नेहभावाचे प्रतीक म्हणून ही वाटिका मुंबईकर नागरिकांना भेट दिली आहे. या वाटिकेचे उद्घाटन ७ फेब्रुवारी १९८६ रोजी मुंबईचे तत्कालीन महापौर छगन भुजबळ यांच्या हस्ते व योकोहामा महानगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. मसाओ इवामोटो यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
गेली साडेतीन दशके पालिकेद्वारे या वाटिकेची देखभाल आणि निगा राखली जात आहे. या जपानी वाटिकेचे संकल्पचित्र जपानी उद्यान विषयातील तज्ज्ञ केन्झो ओगाटा यांनी तयार केले होते. या संकल्पचित्रानुसार या जपानी वाटिकेची निर्मिती ‘योकोहामा’ येथील उद्यान तज्ज्ञ मिकिया इमाझेकी व सेयजी कोजिया यांच्या मार्गदर्शनात नोव्हेंबर १९८५ ते जानेवारी १९८६ या कालावधी दरम्यान करण्यात आली.च्जपानमध्ये उद्यानविषयक काम करणाºया नऊ कर्मचाºयांच्या आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाºयांच्या अथक परिश्रमातून ही वाटिका साकारण्यात आली होती.
जपानी वाटिकेचे वैशिष्ट्य
जगभरातील उद्यानांमध्ये जपानी उद्यान किंवा जपानी वाटिकांची स्वतंत्र ओळख आहे. जपानी उद्यान हे जपानी तत्त्वज्ञान व सौंदर्यशास्त्रावर आधारित असते. या उद्यानात निसर्गातील पंचमहाभुतांची प्रतीके असतात. जपानी तत्त्वज्ञान, सौंदर्यदृष्टी, कलात्मकता व पर्यावरणाचा समतोल, अशा विविध सकारात्मक बाबींचा समतोल जपानी उद्यानांमध्ये साधण्यात येतो. झाडे-झुडपे, फुलांची झाडे, बांबूची झाडे, आकर्षक पायवाटा, छोटे तळे, खडकांची आकर्षक रचना आणि जपानी पद्धतीचे कलात्मकरीत्या लावलेले कंदील किंवा दिवे ही जपानी उद्यानांची ठळक वैशिष्ट्ये असतात. या सर्व वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील जपानी वाटिकेतही दिसून येतात.