Join us  

"जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा मान ठेवायला पाहिजे होता"; शिवसेना नेता नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 3:15 PM

शिष्टमंडळाचे व मनोज पाटील जरांगे व आंदोलन कर्त्यांची मते न जुळल्यामुळे अखेर आल्यापावली या शिष्ट मंडळाला परत जावे लागले आहे.

मुंबई/जालना - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात वातावरण तापले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मंगळवारी मुख्यमंत्र्यांचे एक शिष्टमंडळ दाखल झाले होते, या शिष्टमंडळाने मनोज पाटील जरांगे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली व तीस दिवसाची मुदत सुद्धा यावेळी मागितली गेली. परंतू, जरांगे यांनी कुठल्याही प्रकारची मुदत न देता फक्त चार दिवसाचा अवघी सरकारला दिला आहे. या निष्फळ चर्चेवर जालन्यातील नेते आणि माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी भूमिका मांडली. 

शिष्टमंडळाचे व मनोज पाटील जरांगे व आंदोलन कर्त्यांची मते न जुळल्यामुळे अखेर आल्यापावली या शिष्ट मंडळाला परत जावे लागले आहे. ३० दिवसांनंतर एक दिवस सुद्धा शासन वेळ घेणार नाही. मात्र, एवढी विनंती करून सुद्धा आंदोलनकर्त्यांनी ऐकलेले नाही, असे म्हणत अर्जून खोतकर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा मान ठेवायला पाहिजे होता, असेही ते म्हणाले. 

मला असं वाटतं की, मनोज पाटील जरांगेंनी ऐकायला पाहिजे होतं. मुख्यमंत्र्यांचा मान ठेवायला पाहिजे होता. समाजाचं भलं करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी ऐकाव्या लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेकदा तह केला. ते ४ पावले मागे आले आणि २५ पाऊले पुढे गेले, यश मिळवलं. 

समाजाच्या हितासाठी जरांगे पाटलांनाही यश मिळवता आले असते. मला अजूनही वाटतं, चर्चेची दारं बंद झालेली नाहीत, ती खुली आहेत. अजूनही चर्चा होऊ शकते, असे म्हणत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मनोर जरांगे पाटील यांच्यासमवेत झालेल्या चर्चेचा वृत्तांत सांगितला. तसेच, जरांगे पाटील यांनी आंदोलन माघारी न घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त केली.  

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज ९ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे, त्यांना सलाईन लावण्यात आले असून डॉक्टरांकडून सातत्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात आहे.  

टॅग्स :जालनामराठा आरक्षणएकनाथ शिंदेमुख्यमंत्री