मुंबई/पुणे-जालन्यातील मराठा आंदोलनाला राज्यातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. उपोषणाचा आज १४ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी वैद्यकीय उपचारासाठी पथक आल्यानंतर जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यांनी अन्नपाणी सोडलं असून उपचारही नाकारले आहेत. मराठा आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच तपासणी, उपचार घेणार असल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली. आता, सरकारच्यावतीने मराठा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना विनंती केली आहे.
राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांना सातत्याने उपोषण मागे घेण्याबाबत विनंती करण्यात येत आहे. मात्र, ते आपल्या उपोषण व मागणीवर ठाम आहेत. आता, राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्यांना उपोषण मागे घेण्याचं विनंतीपर आवाहन केलंय. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वच आघाड्यांत आपण अपयशी ठरलो आहोत. या अपयशाचं बर्डन आता सगळ्या राज्याला भोगावं लागत आहे. आता, जरांगे पाटलांनाही माझी विनंती आहे की, त्यांनी प्रश्न प्रतिष्ठेचा करु नये, सरकार सकारात्मक आहे, सरकारला संधी द्यावी. प्रश्न सुटला नाही तर उपोषणाचा मार्ग आहेच, असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचवले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत १४ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. शासनासमवेत चर्चेच्या तीने फेऱ्या अयशस्वी झाल्या असून, रविवारी सकाळपासून जरांगे यांनी पाणी पिणे, उपचार घेणे बंद केले आहे. वैद्यकीय पथक सोमवारी सकाळी वैद्यकीय पथक १०:४० वाजता उपोषणस्थळी आले होते. पथकातील डॉ. अतुल तांदळे यांनी बीपी, शुगर सह इतर तपासण्या करू द्या, अशी जवळपास अर्धा तास विनवणी केली. परंतु, जरांगे यांनी तपासणी, उपचारालाही नकार दिला. त्यामुळे, पाटील किती दिवस असंच राहतील हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
समाजासाठी दोन पाऊले मागे येईल - पाटील
मनोज जरांगे पाटील सरकारचे आणखी एखादे शिष्टमंडळ आल्यास अन्नपाणी सुरु करतील का, असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर, मी समाजासाठी दोन पाऊले मागे यायला तयार आहे. पण, केवळ काही दिवसांची मुदत मागून उपयोग नाही, सरकारने आता आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजाने गेल्या ७५ वर्षात सर्वच राजकीय पक्षांना भरभरुन दिलं आहे. त्यामुळे, आता सर्वच राजकीय पक्षांची बारी आली आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी आजच्या बैठकीवर भाष्य केलं.