Join us

जरांगे यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी : ॲड. प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 4:49 PM

 मनोज जरांगे  यांना उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे.

श्रीकांत जाधव 

मुंबई : मनोज जरांगे  यांना उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे. त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करू नये. आता आरक्षण मिळविण्याचा भाग आहे असे आम्ही मानतो. म्हणून, जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथील लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांना दिला. 

मुंबई येथील वंचित कार्यालयात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.  कोणत्याही पक्षाच्या आधाराने लढले, तर त्या पक्षांची बंधने येतात आणि बंधने असली की, गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गरीब मराठ्यांचे ताट आणि ओबीसींचे ताट वेगळं असावं अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.  जरांगे जालना लोकसभा मतदारसंघातून  निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या निमित्ताने गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यात येतो हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. ते मान्य करतील अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

ओबीसींमध्ये राजकीय जागृती झाली याबाबत मला आनंद आहे. आता खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात झाली असे मी मानतो. आपल्या अधिकारांची लढाई असे स्वरूप आता येत आहे आणि भाजपची धार्मिक विचारधारा गळून पडत आहे असे आम्ही मानत असल्याचेही त्यांनी सांगितले.