आदिशक्तीचा जागर !

By admin | Published: October 14, 2015 03:15 AM2015-10-14T03:15:31+5:302015-10-14T03:15:31+5:30

शारदीय नवरात्रौत्सवाला मंगळवारी विधिवत घटस्थापना करून उत्साहात सुरुवात झाली. सर्वत्र नऊ दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे.

Jasar of Adashakti! | आदिशक्तीचा जागर !

आदिशक्तीचा जागर !

Next

मुंबई : शारदीय नवरात्रौत्सवाला मंगळवारी विधिवत घटस्थापना करून उत्साहात सुरुवात झाली. सर्वत्र नऊ दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. पहिल्याच माळेला शहर-उपनगरातील देवीच्या मंदिरांमध्ये जाऊन नागरिकांनी मनोभावे दर्शन घेतले. शिवाय, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांच्या देवींचेही धूमधडाक्यात आगमन झाले आहे. वातावरणातील उत्साह वाढला आहे. शिवाय, गेल्या काही वर्षांत दिसून येणारा नवरंगांचा ट्रेंडही आता सर्रास दिसून येईल.
शक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या देवीचा उत्सव सुरू झाला आहे. शहर-उपनगरातील देवी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम, तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सवात सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील येथील महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी आणि शीतलादेवी या प्रमुख मंदिरांसह अन्य देवी मंदिरांवर विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे श्रेय प्रबोधनकार ठाकरे यांचे आहे. प्रबोधनकारांनी दादरमध्ये पहिला नवरात्र उत्सव सुरू केला. ‘प्लाझा’समोरच्या खांडके बिल्डिंगमध्ये त्यांनी हा उत्सव सुरू केला. आजही या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो. ‘प्लाझा’च्या शेजारच्या गल्लीत भाजी गल्लीची देवी बसते. दादर स्टेशनजवळ कीर्तिकर मार्केटमध्येही देवीची प्रतिष्ठापना केली जाते.
प्रभादेवी येथे खेड गल्लीमध्ये देवीची प्रतिष्ठापना होते, तर माहीमच्या समोर सप्तकोटेश्वर मंदिर गल्लीतही देवीचा उत्सव भरवला जातो. अंधेरीच्या मार्केटमध्येही वर्षानुवर्षे देवीची स्थापना होत असते. कुर्ला स्टेशनजवळची अंबिका मंडळाची देवीही प्रसिद्ध आहे. परळ-लालबाग भागात गणपती इतकेच महत्त्व देवीच्या महोत्सवाला आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे मुंबईतले देवीपूजा करणारे एक जुने मंडळ. चिंचपोकळी स्टेशनशेजारीच त्याची प्रतिष्ठापना होते. तर गणेशगल्ली ही गणपती उत्सवासाठी प्रसिद्ध असली, तरी श्रींची आणि दुर्गेची प्रतिष्ठापना तेथे एकाच वर्षी झाली. याशिवाय मुंबादेवी, गावदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, जाखादेवी, जीवदानी, वाळकेश्वर, अंबादेवी इत्यादी ठिकाणी देवीच्या मंदिरातच उत्सव साजरा होतो.
महिलांना अन्यायाविरोधात लढण्याची शक्ती मिळावी, यासाठी नवरात्रातील नऊ रात्री देवी मंदिरांमध्ये देवीचा जागर होणार आहे. तिसऱ्या माळेला आणि सातव्या माळेला देवीच्या मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणार असले, तरी या परिसरात नऊही दिवस भाविकांची गर्दी असते. महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था देवी मंदिरांमध्ये करण्यात आली असून मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
नवरंग सर्वदूर ...: नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने पहिल्याच दिवशी शहर-उपनगरातील मुंबईकरांनी लाल रंगांची वस्त्रे परिधान केलेली दिसून आली. कार्यालये, लोकल, महाविद्यालये अशा बऱ्याच ठिकाणी लाल रंगाची वस्त्रे परिधान करून नवरंगांचे स्वागत करण्यात आले. या नवरंगांना जरी धार्मिक कारण नसले, तरी यातून मुंबईकरांनी जणू एकात्मतेचे दर्शन घडविले. नवरात्रीच्या काळात अशा विविध रंगांची उधळण करत सर्वच जण याचा आनंद लुटताना दिसून येतात.

यंदाच्या आकर्षणासहित नवसाला पावणारी देवी आणि मंडळांची महती सांगणारे मोठमोठाले होर्डिंग्स आणि बॅनरबाजी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी सुरू केली आहे. पूर्वी केवळ गणेशोत्सवात दिसणाऱ्या बॅनर्सने आता नवरात्रौत्सव व्यापून टाकला आहे. शिवाय, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांमधील जोरदार चुरस या बॅनरबाजीतून दिसत आहे.
नवरात्रौत्सवाच्या उत्साहात नवरंगांच्या साथीला ‘सेल्फी’ची सोबत मिळाली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टिष्ट्वटर अशा सर्वच सोशल नेटवर्किंग साइट्सवर लाल रंगाच्या वस्त्रांमध्ये छायाचित्रे काढून अपलोड करण्यात सर्वच नेटिझन्सने पसंती दर्शविली. शिवाय, नवरात्रौत्सवाच्या काळात ‘सेल्फी’ काढण्यासाठी हे हक्काचे कारण तरुणाईला मिळाले आहे.

Web Title: Jasar of Adashakti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.