Join us

खेड्यापाड्यांत जत्रांमध्ये पाणीटंचाई!

By admin | Published: April 04, 2015 10:47 PM

आजपासून तालुक्यातील १०१ गावे आणि १९ पाड्यांमध्ये विविध ग्रामदेवतांच्या जत्रांना सुरुवात होणार असून यामध्ये जंगी कुस्त्यांचे सामने, गायन पार्ट्या, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार

संजय कांबळे ल्ल बिर्लागेटआजपासून तालुक्यातील १०१ गावे आणि १९ पाड्यांमध्ये विविध ग्रामदेवतांच्या जत्रांना सुरुवात होणार असून यामध्ये जंगी कुस्त्यांचे सामने, गायन पार्ट्या, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून या दरम्यान पहिल्या दिवशी म्हणजे पालखीच्या दिवशी गोड पुरणपोळीच्या तर दुसऱ्या दिवशी यथेच्छ मांसाहाराच्या जेवणावळी उठणार आहेत. या सर्वांसाठी मोेठ्या प्रमाणात पाणी लागते. अशातच वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नादुरुस्त बोअरवेल, अर्धवट नळयोजना या अडचणींमुळे ऐन जत्रांच्या सोहळ्यास पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.सर्वसाधारणपणे हनुमान जयंतीनंतर तालुक्यात जत्रांना सुरुवात होते. ग्रामदेवता, म्हसोबा, वेताळेश्वर, खंडोबा, पिंपळेश्वर, नीळकंठेश्वर, एकवीरा, जीवदानीआई, गावदेवीआई, तिसाई अशा विविध देवदेवतांच्या जत्रांना सुरुवात होते. यात्रा समिती घरोघरी फिरून देणगी जमवते व जत्रा कशी चांगली होईल, यासाठी प्रयत्न करते.आजूबाजूचे मित्र मंडळी, सगेसोयरे, आप्तेष्ट, मान्यवर, पाहुणे यांना निमंत्रणे देतात. भजनी मंडळी, बॅण्जो, डीजे लावून पालखींची मिरवणूक निघते. दुसऱ्या दिवशी कुस्त्या, गायन पार्ट्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. पहिल्या दिवशी गोड जेवणाचा मान असतो. मात्र, दुसऱ्या दिवशी कोंबडे, बकरे यांचा मोठा बेत असल्याने गावात गाड्या उभ्या करायला जागा मिळत नाही. पहाटेपर्यंत जेवणाचे ‘फड’ चालू असतात. या चार ते पाच दिवसांकरिता मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मात्र, जुनाट व जीर्ण झालेल्या पाइपलाइनमधून होणारी पाण्याची गळती, नादुरुस्त बोअरवेल, अर्धवट नळयोजना, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे सध्या खेड्यापाड्यांत पाणीटंचाई सुरू आहे. तालुक्यात ५४ स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना, रायता, दहागाव, खंडावली या तीन प्रादेशिक योजना, २८२ हातपंप असूनही देखभाल दुरुस्ती, पाणीबिल थकबाकी यामुळे या असून नसल्यासारख्याच आहेत. यावर उपाय शोधण्यासाठी ग्रामस्थांनी बैलगाड्या तयार केल्या आहेत.बैलगाड्यांमध्ये दोन ड्रम टाकून पाण्याची सोय केली जाते. १०० ते १२५ रुपये एका ड्रमचे तर १० ते २० रुपये एका हंड्याचे असे दर या बैलगाड्या मालकांकडून घेतले जात आहेत. पैसे गेले तरी चालेल, पण पाणी तरी वेळेवर मिळते. यामुळे याविषयी कोणाचीही तक्रार होत नाही.‘विविध पाणीपुरवठा योजनांचे पाणी वेळेवर मिळेलच, याची खात्री नसल्याने बैलगाडीचे पाणी मागविले जाते. यातून जत्रेपुरती तरी गरज भागते.’- कल्पेश शेलार, अध्यक्ष‘मी जानेवारीपासूनच बैलगाडी तयार करून त्यावर दोन ड्रम ठेवले आहेत. मागणी येईल तसे पाणी पुरवितो.’- मधुकर रोहणे, बैलगाडीमालक, रायता, कल्याण