मुंबई - वैद्यकीय, आयआयटी यासह अन्य परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी अनेक पालक आपल्या पाल्यांना राजस्थान राज्यातील कोटा येथे पाठवितात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर परराज्याच्या सीमा बंद असल्याने महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी कोटा येथे अडकले आहेत. त्यामध्ये, पश्चिम वऱ्हाडातील जवळपास २०० विद्यार्थी विविध वसतिगृहात अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना स्वजिल्ह्यात आणण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी १०० बसेस धुळ्याहून कोटाकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. अनिल परब यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून हे सांगितलं.
कोटा येथे वैद्यकीय, आयआयटी पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी अडकले आहेत, तर पश्चिम वऱ्हाडातील जवळपास २०० विद्यार्थी गेलेले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन आहे. लॉकडाऊनमुळे पश्चिम वऱ्हाडासह राज्यातून कोटा येथे गेलेले सर्व विद्यार्थी तेथे अडकलेले आहेत. कोटा येथील खासगी शिकवणी वर्ग बंद आहेत, ऑनलाईन क्लासही होत नाहीत. गृहपाठही नाही आणि वसतिगृहाच्या बाहेरही पडता येत नाही. त्यात कोटा शहरात कोरोना रूग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे पालकांची चिंता अधिकच वाढली असून, १५ ते १६ वर्षाच्या या मुलांनाही घराची ओढ लागली आहे.
या मुलांसोबतच वसतीगृहात असणारी उत्तर प्रदेशातील मुलांना उत्तर प्रदेश सरकारने शासनाच्या गाड्यांमधून स्वराज्यात नेले आहे. या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र सरकारनेदेखील राज्यातील या मुलांना स्वराज्यात आणण्यासाठी व्यवस्था करावी किंवा पालकांना परवानगी द्यावी, अशी मागणी पालकांमधून जोर धरत होती. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने आज निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसात १०० बसेस धुळ्याहून कोटाकडे रवाना होतील, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले. या मुलांची घरवापसी करताना, सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्य सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या मुलांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान, युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे.