Join us

जाऊ दे रे गाडी... राज्यात ४ दिवसांतच एवढ्या लाख महिलांनी केला ST ने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 5:21 PM

राज्यभरात गेल्या ४ दिवसांचा विचार केल्यास महिला प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे

मुंबई -  राज्य परिवहन महामंडळाची बस म्हणजे आपली एसटी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ग्रामीण भागात तर एसटी आणि गावकऱ्याचं एक वेगळंच नातं आहे. मात्र, स्वत:ची वाहनं आल्यामुळे, किंवा खासगी वाहनांची संख्या वाढल्याने एसटी बसच्या प्रवासाकडे काहीशी पाठ फिरली. तरीही, आजही सर्वसामान्यांना एसटीचा प्रवास, सुखाचा आणि समाधानाचा प्रवास वाटतो. त्यातच, राज्य सरकारने महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत दिली आहे. १७ मार्चपासून ही योजना राज्यभर सुरूही करण्यात आली. ‘ ५० टक्के, एकदम ओक्के’ अशीच भावना व्यक्त करत महिलांना आनंद व्यक्त केला. 

राज्यभरात गेल्या ४ दिवसांचा विचार केल्यास महिला प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. १७ मार्च ते २० मार्च या ४ दिवसांच्या कालावधी तब्बल ४८ लाख महिलांना एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास केलाय. परिणामी, खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलाही एस.टी.कडे वळत आहेत. त्यामुळे, अवघ्या ४ दिवसांतच राज्यात एस.टी.ने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्याही वाढली आहे. तसेच, एस.टी. महामंडळाचे उत्पन्नही वाढले आहे.

चार दिवसात राज्यभरात तब्बल ४८ लाख महिला प्रवाशांनी अर्ध्या तिकिटावर प्रवास केला आहे.  जो एकूण प्रवासी संख्येच्या ३० टक्के आहे. एकट्या परभणीत ६५ हजार तर धाराशिवमध्ये ५७ हजार महिलांनी चार दिवसात या योजनेचा लाभ घेतला आहे.   महामंडळाकडून आतपर्यंत ३९ सवलती दिल्या जात होत्या. ज्यात आता 75 वर्षावरील नागरिकांना मोफत आणि आता महिलांना 5५० % तिकीट सवलत दिली जात आहे. याचा मोठा आर्थिक भार हा महामंडळावर पडतोय.

दरम्यान, एस.टी. महामंडळाने १७ मार्चपासून महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ६५ वर्षांवरील महिलांना ५० टक्के सवलत दिली जात होती. परंतु, आता प्रत्येक महिलेला ही सवलत दिली जात आहे. त्यामुळे खासगी बसने प्रवास करणाऱ्या महिलाही एस.टी.ने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. 

टॅग्स :महिलाबसचालकमुंबई