जावेद अख्तर, आम्ही म्हणतोय ते बरोबर आहे ना? हिंदुराष्ट्रावरुन शिवसेनेचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 12:27 PM2021-09-06T12:27:58+5:302021-09-06T12:28:23+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं समर्थन करणारे देखील तालिबानी प्रवृत्तीचे असल्याचं विधान प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे.
मुंबई - प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या विधानावरुन देशभरात गदारोळ माजला आहे. भाजपा नेत्यांनी अख्तर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांविरुद्ध आंदोलनेही केली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना पत्र लिहून या मुद्द्यावर जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा, असं आव्हानच दिलं आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेनंही अख्तर यांचं ते विधान आम्हाला मान्य नसल्याचं ठणकावून सांगितलंय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं समर्थन करणारे देखील तालिबानी प्रवृत्तीचे असल्याचं विधान प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप नेत्यांनी अख्तर यांच्यावर जोरदार प्रहार करायला सुरुवात केली आहे. आता, शिवसेनेनंही अख्तर यांचे विधान आपल्याला मान्य नसल्याचं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.
चीन, श्रीलंकेसारख्या राष्ट्रांचा अधिकृत धर्म बौद्ध, अमेरिका, युरोपियन राष्ट्रे ख्रिश्चन, तर बाकी सर्व राष्ट्रे 'इस्लामिक रिपब्लिक' म्हणून आपापल्या धर्माची शेखी मिरवीत आहेत; पण जगाच्या पाठीवर एक तरी हिंदू राष्ट्र आहे काय? हिंदुस्थानात बहुसंख्य हिंदू असूनही ते राष्ट्र आज धर्मनिरपेक्षतेचाच झेंडा फडकवून उभे आहे. बहुसंख्य हिंदूंना सतत डावलले जाऊ नये हीच एक माफक अपेक्षा त्यांची आहे. जावेद अख्तर, आम्ही म्हणतोय ते बरोबर आहे ना?, असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.
पाकिस्तान, चीनसारख्या राष्ट्रांनी तालिबानी राजवटीचे समर्थन केले; कारण या दोन्ही देशांत मानवी हक्क, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यांचे काहीच मूल्य राहिलेले नाही. हिंदुस्थानची मानसिकता तशी दिसत नाही. एकतर आपण कमालीचे सहिष्णू आहोत. लोकशाहीच्या बुरख्याआड काही लोक दडपशाही आणू पाहत असले तरी त्यांना मर्यादा आहेत. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे हे योग्य नाहीच, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलंय.
अख्तरांनी धर्मांधाचे मुखवटे फाडले
जावेद अख्तर हे त्यांच्या सडेतोड वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. या देशातील धर्मांधता, मुस्लिम समाजातील अतिरेकी विचार, राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून फटकून वागण्याचे धोरण यावर जावेद यांनी कठोर प्रहार केले आहेत. देशात जेव्हा जेव्हा धर्मांध, राष्ट्रद्रोही विकृती उसळून आल्या त्या प्रत्येक वेळी जावेद अख्तर यांनी त्या धर्मांधांचे मुखवटे फाडले आहेत. धर्मांधांची पर्वा न करता त्यांनी 'वंदे मातरम्'चे गान केले आहे. तरीही संघाची तालिबानशी केलेली तुलना आम्हाला मान्य नाही. संघ आणि तालिबानसारख्या संघटनांच्या ध्येयामध्ये कोणताही फरक नसल्याचे त्यांचे म्हणणे सर्वस्वी चूक आहे. संघाची भूमिका व त्यांच्या विचारांशी मतभेद असू शकतात आणि हे मतभेद जावेद अख्तर वारंवार मांडत असतात. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आहे म्हणून
राम कदमांचा इशारा
जावेद अख्तर यांचं वक्तव्य हे केवळ दुर्दैवी नाही तर, संघ, विश्व हिंदू परिषदेच्या कोट्यवधी कार्यकर्ते आणि जगभरातील या विचारधारेला मानणारे कोट्यवधी लोकांचा अपमान आहे! जोपर्यंत जावेद अख्तर हाथ जोडून माफी मागत नाही तोपर्यंत त्याची, त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही चित्रपट या भूमित चालू देणार नाही," असा इशाराच राम कदम यांनी दिला आहे.
नितेश राणेंचं अख्तरांना पत्र
नितेश राणे यांनी जावेद अख्तरांना दोन पानी पत्र पाठवलं आहे. यात नितेश राणे यांनी अख्तरांनी संघाची तुलना तालिबानशी केल्याच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. तसंच असं करणं हा पूर्वनियोजित षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. अख्तरांना हिंदुत्वाबद्दल एवढा राग कशासाठी? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.