मनसेच्या दीपोत्सवात जावेद अख्तरांचं धमाकेदार भाषण; जय सियारामचे लावले नारे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 09:26 PM2023-11-09T21:26:20+5:302023-11-09T21:27:13+5:30
श्रीरामाबद्दल अनेकांची धार्मिक आस्था आहे. परंतु आमच्यासारख्या नास्तिकांनाही गर्व आहे की, मी अशा देशात जन्मला आलोय जो रामचंद्र आणि सीतेचा देश आहे असं त्यांनी म्हटलं.
मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आले. यावर्षी दीपोत्सवाचे ११ वे वर्ष असून या उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध सलीम-जावेद जोडी म्हणजे सलीम खान आणि जावेद अख्तर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचसोबत अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीही मनसेच्या दीपोत्सावला हजेरी लावली. या सोहळ्याला जावेद अख्तर यांचे धमाकेदार भाषण झालं त्यात जय सियारामचे नारेही लागले.
जावेद अख्तर म्हणाले की, मी सर्वप्रथम राज ठाकरेंचा आभारी आहे. मला काही गोष्टी खुल्यापणाने बोलावं लागेल. राज ठाकरेंना आणखी कुणी भेटलं नाही असंही काहीजण म्हणतील, जावेद स्वत:ला नास्तिक म्हणवतात मग हे एका धार्मिक सोहळ्याला कसे आले? असंही लोक म्हणतील. यामागची २ कारणे आहेत. राज ठाकरे हे माझे खूप घनिष्ट मित्र आहेत आणि राज ठाकरे यांनी शत्रूलाही आमंत्रण दिले तरी तो नकार तर देऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी श्री रामचंद्र आणि सीतेला केवळ हिंदूचा वारसा मानत नाही. या देशातील प्रत्येक नागरिक जो हिंदुस्तानात जन्मला आहे. रामायण त्यांचा सांस्कृतिक वारसा आहे. रामायण, महाभारत याविषयी हिंदुस्तानीला माहिती हवं, हा आपला इतिहास आहे, आपली संस्कृती आहे. आपली ओळख आहे. ही अशी गोष्ट आहे ज्यावर आपण कितीही गर्व केला तरी कमी आहे. श्रीरामाबद्दल अनेकांची धार्मिक आस्था आहे. परंतु आमच्यासारख्या नास्तिकांनाही गर्व आहे की, मी अशा देशात जन्मला आलोय जो रामचंद्र आणि सीतेचा देश आहे असं त्यांनी म्हटलं. अख्तर यांच्या या विधानावर जय सियारामचे नारे लोकांनी लावले.
तसेच प्रभू राम हा आस्थेचा विषय आहे. लखनौमध्ये मी लहान असल्यापासून रामलीला पाहत आलोय, मर्यादा पुरुषोत्तमाची गोष्ट जेव्हा करतो तेव्हा डोळ्यासमोर रामचंद्र उभे राहतात. रामकथा सीतेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हे त्यांचे प्रेम होते. रामचरित्रमानसमध्ये याचा अनुवाद आहे. जेव्हा डोळ्यात पाणी आणून सीतामातेला हनुमानाने श्रीरामाचा संदेश दिला होता. मी लखनौला लहानाचं मोठं झालोय, तिथे प्रत्येक माणूस सकाळी सकाळी जय सियाराम बोलतो, सिया आणि रामाला वेगळे करू शकत नाही. जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम असा तिनदा माझ्यासोबत नारे द्या असं म्हणत जावेद अख्तर यांनी उपस्थितांना प्रभू राम आणि सीता यांच्यातील नात्याचे वर्णन केले.