मुंबई : वडाळा येथे अग्निशमन दलामार्फत प्रशिक्षण सुरू असताना विजय मालवणकर (५२) यांचा मृत्यू झाला. प्रशिक्षणाचा ताण त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असण्याची शक्यता मुंबई अग्निशमन दलाने फेटाळली आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.वडाळा कमांडिंग सेंटरमध्ये शुक्रवारी प्रशिक्षण सुरू असताना ही घटना घडली. प्रशिक्षणाच्या १० ते १२ मिनिटांनंतर दिंडोशी अग्निशमन केंद्राचे जवान मालवणकर यांनी दुसऱ्या प्रशिक्षण सत्रात भाग घेतला. त्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर ते इतर जवानांसह लेक्चरला बसले असता त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अन्य जवानांनी त्यांना तातडीने पालिकेच्या सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.मालवणकर १९९२ मध्ये अग्निशमन दलात रुजू झाले होते. सध्या ते दिंडोशी केंद्रात कार्यरत होते. ताण पडेल, असा कोणताही प्रकार प्रशिक्षणात नव्हता. त्यामुळे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे.
वडाळ्यात प्रशिक्षणादरम्यान जवानाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 6:51 AM