मुंबई – वीरपत्नी, वीरमाता सीमेवर लढायला गेल्या नसतील, पण त्यांचे धैर्य, साहस, वीरता तसूभरही कमी नाही. किंबहुना त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच जवान देशासाठी बलिदान देण्यास मागेपुढे पाहत नाहीत, अशी भावना व्यक्त करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्यातील चार वीरमाता आणि वीरपत्नी यांचा गौरव केला. यावेळी भारतीय लष्करासाठी मार्शल धून संगीतबद्ध करणाऱ्या नागपुरच्या गायिका संगीतकार डाँ तनुजा नाफडे यांनी आपला प्रवास उलगडून सांगितला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयात अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांच्या उपस्थितीत, आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका, शहीद मेजर अतुल गर्जे यांच्या वीरपत्नी हर्षला, शहीद साताप्पा पाटील यांच्या वीरपत्नी अश्विनी, शहीद मेजर विनायक गोरे यांच्या वीरमाता अनुराधा गोरे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी लष्करासाठी मार्शल धून बनविणाऱ्या डाँ तनुजा नाफडे या विशेष निमंत्रित होत्या. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डाँ मंजूषा मोळवणे, माविमच्या संचालक कुसुम बाळसराफ, श्रीमती कुंटे, अभिनेत्री मीना नाईक, विविध समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
देशातील वीरमाता आणि वीरपत्नींप्रती असलेला आदर राज्य महिला आयोगाने त्यांचा गौरव करुन व्यक्त केला. राज्याच्या विविध भागातुन आलेल्या सन्मानित वीरपत्नी आणि वीरमाता त्यांचा, कुटुंबियांचा जीवनप्रवास, संघर्ष सांगत असताना उपस्थित भावूक झाले. देशाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र, प्रतिकूल परिस्थितीतही सीमेवर पहारा देणाऱ्या लष्करासाठी मार्शल धून संगीतबद्ध करण्याची संधी नागपुरच्या गायिका-संगीतकार डॉ. तनुजा नाफडे यांना मिळाली. इंग्रजांच्या काळापासून पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव असलेलली मार्शल धून भारतीय लष्करासाठी वाजविली जात होती, या मार्शल धूनच्या संगीतात भारतीयत्वाची उणीव होती. डॉ. नाफडे यांनी ही उणीव भरून काढली. निवडीच्या कठोर प्रक्रियेतून ही धून भारतीय लष्करासाठी निवडण्यात आली. स्वातंत्र्य दिन तसेच प्रजासत्ताकदिनी लष्करी संचलनाच्या वेळी ही मार्शल धून आता संपूर्ण देशात ऐकायला मिळणार आहे. या कामासाठी डॉ. तनुजा नाफडे यांना अलीकडेच लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिल्लीतील सोहळ्यात ताम्रपत्र देऊन गौरविले. नाफडे यांच्यामुळे महाराष्ट्राला हा बहुमान मिळाला आहे.
वीरपत्नी, वीरमाता यांचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटीबद्ध असून आयोगच्या अध्यक्षा म्हणून आपण दुवा म्हणून काम करु असा विश्वास यावेळी विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.