मुंबई : पावसाळ्याला अवघा एक महिना उरला असताना महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांनी आता वेग घेतला आहे. यामुळे पहारेकऱ्यांनीच रस्त्यावर उतरत नाल्यांच्या सफाईची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत भाजपने आज पश्चिम उपनगरातील काही नाल्यांची तसेच रेल्वे रुळाखालून जाणाऱ्या नाल्यांची पाहणी केली. मात्र या नाल्यांची सफाई ३० ते ३५ टक्केच झाली असून ठेकेदार या कामात नापास झाल्याचे भाजपने निदर्शनास आणले आहे.
लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर भाजपने महापालिकेकडे पुन्हा मोर्चा वळवला आहे. निवडणुकीत युती असलेल्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करण्यास पहारेकऱ्यांनी सुरुवात केली आहे. मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेणाऱ्या भाजपने नालेसफाईची पाहणी सुरू केली आहे. सांताक्रुझ येथील ग्रीन स्ट्रीट नाला, गझदरबांधचा परिसर, एअरपोर्ट नाल्याचा सांताक्रुझ बेस्ट कॉलनी परिसर आणि पश्चिम रेल्वेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा खार येथील भारतनगर नाला व चमडावाडी नाल्याचा रेल्वे कल्वर्ट याची पाहणी भाजप नगरसेवकांनी शुक्रवारी केली.
रेल्वे कॉलनीत रेल्वे रुळाखालून खार पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाºया नाल्यातील गाळ अद्याप काढण्यात आलेला नाही. तर बेस्ट कॉलनीतील नाला जलपर्णीने पूर्णपणे भरलेला असून त्याची सफाई करण्यात आलेली नाही. गझदरबांध येथील कामही अपूर्णच आहे. ही केवळ ३० ते ३५ टक्केच कामे झाली आहेत, असा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. महापालिकेत भाजपचे ८३ नगरसेवक आहेत, या नगरसेवकांमार्फत त्यांच्या त्यांच्या विभागातील नालेसफाईची नियमित पाहणी करून पालिका प्रशासनाला जाब विचारण्यात येणार आहे.
दरवर्षी परिस्थिती ‘जैसे थे’च!दरवर्षी पावसाळा येण्यापूर्वी मुंबई महापालिका नाल्यांची साफसफाई हाती घेते. छोट्या नाल्यांपासून मोठे नाले साफ करण्याचे काम महापालिका करते. नाल्यासोबत मिठी नदीमधील गाळही महापालिकेकडून काढला जातो. यासाठी महापालिका कंत्राटदार नेमते. मग कंत्राटदारांकडून नालेसफाईचे काम हाती घेतले जाते. मात्र कितीही नालेसफाई केली तरी पावसाळ्यात नाले गाळात रुततातच. शिवाय गाळ नीट काढला जात नसल्याने ते पावसाळ्यात तुंबतात.
नाल्यातील गाळ, मिठीतला गाळ काढून लगतच टाकला जातो. परिणामी पावसाळा सुरू झाला की हा गाळ पुन्हा नाला किंवा मिठीत वाहून जातो. यापूर्वी नाले आणि मिठी साफ केल्यानंतरही अशा घटना घडल्याने मुंबईकरांनी कायम प्रशासन आणि कंत्राटदारांवर टीका केली आहे. प्रत्यक्षात मात्र हाती काहीच लागलेले नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगर परिसरातील मिठी नदीमधील गाळ काढण्याचे काम प्रशासनाकडून केले जाते. परंतु यापूर्वी कित्येक वेळा काढलेला गाळ मिठी नदीलगत टाकून ठेवला जातो आणि पाऊस पडला की हा गाळ पुन्हा मिठीत वाहून जातो.वाकोला नाला येथेही हीच परिस्थिती असून, मरोळ येथेही हेच चित्र आहे. विशेषत: कंत्राटदाराकडून काढण्यात आलेला गाळ, गाळाचे वजन यावर यापूर्वीही टीका झाली असून, राजकीय पक्षांनी प्रशासनावर आसूड ओढले आहेत. मात्र प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने पावसाळा संपला तरी नाले गाळातच रुतल्याचे चित्र मुंबई शहर आणि उपनगरात असते.