जव्हारमध्ये तीन जन्मांध मुलांना मिळाली दृष्टी
By Admin | Published: February 11, 2015 10:45 PM2015-02-11T22:45:26+5:302015-02-11T22:45:26+5:30
पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे श्री गुरूदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित अंध व गतीमंद मुलांची दिव्य विद्यालय ही निवासी शाळा आहे
जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे श्री गुरूदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित अंध व गतीमंद मुलांची दिव्य विद्यालय ही निवासी शाळा आहे. या संस्थेच्या संस्थापिका प्रमिलाताई कोकड यांच्या प्रयत्नामुळे व मालाड येथील डॉ. आनंद जयपुरिया संजीवनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या सामाजिक बांधीलकीमुळे या शाळेतील तीन जन्मांध मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा दृष्टी दिली आहे.
या निवासी शाळेतील दृष्टीबाधित व गतीमंद विद्यार्थ्यांची १ फेब्रुवारीला संजीवनी रुग्णालयातील डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने मोफत तपासणी केली. तपासणी नंतर येथील अर्चना सोन्या नडगे (११), समाधान महादु जाधव (७) व रंगनाथ वाडघे (११) या अंध विद्यार्थ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शस्त्रक्रिया केल्यास दृष्टी येण्याची शक्यता डॉक्टरांनी प्रमिलाताई यांच्याकडे वर्तविली. तसेच शस्त्रक्रिया आणि हॉस्पिटल व औषधोपचार मोफत करून देण्याची तयारी दर्शविली. प्रमिलातार्इंनी याला तात्काळ संमती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ५ तारखेला प्रमिलातार्इंनी शिक्षक वैभव हाडळ व दिलीप लोखंडे यांना बरोबर घेवून विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी मालाड गाठले. डॉक्टरांनी तपासणी करून लगेच दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डोळ्यांच्या १ लाख शस्त्रक्रिया केलेले तज्ज्ञ डॉक्टर शाम अगरवाल यांनी आपला सर्व अनुभवपणाला लावून मुलांच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.
यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी लेन्सच्या मदतीसाठी सुरेश भगेरीया, दिलीप लोखंडे, अनुप खेमडा, प्रमोद क्षीरसागर यांचे हात पुढे सरसावले. त्यांनी अतिशय महाग अशा ५० हजार रू. च्या लेन्स, मुलांची निवास व्यवस्था, औषधे व भोजन व्यवस्था इ. सेवा मोफत पुरविल्या.
प्रमिलाताई, डॉ. शाम अगरवाल तसेच ज्यांनी मदत केली त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. या तीनही मुलांना आता जव्हार येथील दिव्य विद्यालयात आणण्यात आले असून त्यांचे पालक देखील त्यांच्या देखभालीसाठी आले आहेत. हे तीनही विद्यार्थी आता माणसे ओळखू शकतात. ही मुले आपल्याला पाहू शकतात, हे बघून त्यांच्या पालकांना अश्रु आवरत नव्हते. या मुलांना दिसेल, ही आशा आम्ही सोडून दिली होती. परंतु प्रमिलाताईच्या रुपाने आम्हाला देव पहावयास मिळाला अशी भावनिक प्रतिक्रीया अश्रुनयनांनी दिली. पालघर जिल्ह्णातील जव्हार, मोखाड्यासारख्या दुर्गम भागातील आदिवासी गावपाड्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवा मिळावी यासाठी संस्था वैद्यकीय सेवा केंद्र सुरू करणार असून ज्यांना डोळ्यांची तपासणी करावयाची आहे त्यांनी दिव्य विद्यालय जव्हार येथे संपर्क साधावा असे प्रमिलाताई कोकड यांनी आवाहन केले असून ९२७००९०९४४ व ९६८९१४८६१४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.