Join us

‘न्याय यात्रा’ पोहोचली मुंबईत

By admin | Published: February 08, 2016 4:10 AM

यालयाचे नाव ऐकून सामान्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. न्यायालयात घालाव्या लागणाऱ्या खेपा, त्यात जाणारा वेळ याचा विचार करता अनेकांना ‘न्यायालयात जाऊच नये’ असे वाटते

मुंबई : न्यायालयाचे नाव ऐकून सामान्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. न्यायालयात घालाव्या लागणाऱ्या खेपा, त्यात जाणारा वेळ याचा विचार करता अनेकांना ‘न्यायालयात जाऊच नये’ असे वाटते. प्रत्यक्षात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालये अस्तित्वात आली. सामान्यांना आपला हक्क समजावण्यासाठी आणि न्यायालयात काही बदल घडवून आणण्यासाठी जगात पहिल्यांदाच निघालेल्या ‘न्याय यात्रे’ने रविवारी दहिसर चेकनाका येथून मुंबईत प्रवेश केला. मुंबईच्या ‘फोरम फॉर फास्ट जस्टिस’ संस्थेने ३० जानेवारीपासून दिल्ली येथून यात्रेला प्रारंभ केला. काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोलकाता अशी ही यात्रा भारतभर फिरणार आहे. दोन भागांत ही यात्रा विभागली असून, एका यात्रेचे नेतृत्व भगवान रयाणी तर दुसऱ्या यात्रेचे नेतृत्व प्रवीण पटेल करीत आहेत. या यात्रेत गुजरातच्या पालनपूर येथील लॉ महाविद्यालयाचे विद्यार्थीही सहभागी झाल्याची माहिती वर्षा विद्या विलास यांनी दिली.‘न्यायतंत्र वाचवा, देश वाचवा’, ‘तारीख पे तारीख बंद करे - समयपर और सही न्याय दे’ अशी नारेबाजी करत ही यात्रा देशातील विविध राज्यांत जिल्ह्यांत फिरत आहे. सामान्यांना येणारा न्यायालयाचा अनुभव पाहता न्यायालयात बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच ही यात्रा काढण्यात आली आहे. अजूनही सामान्य जनतेमध्ये न्यायालय आणि कायद्याविषयी अज्ञान आहे. त्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे, याचीही जनजागृती केली जात आहे. न्यायालयीन कामकाजात बदल व्हावेत म्हणून सुरू असणारी ही यात्रा ३ मार्च रोजी मथुरा येथे एकत्र येणार आहे. ४ मार्च रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे. ५ आणि ६ मार्च रोजी राष्ट्रीय अधिवेशन घेऊन एक निवेदन तयार करण्यात येणार आहे, असे वर्षा विद्या विलास यांनी सांगितले. (प्रतिनिधी)