Join us

ज्येष्ठ नागरिकाच्या अपहरणप्रकरणी टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 2:41 AM

एका वृद्धाचे अपहरण करून त्यांना लुबाडण्याचा प्रकार कांजूरमार्गमध्ये घडला होता. या प्रकरणी तीन जणांच्या मुसक्या आवळण्यात गुरुवारी पोलिसांना यश आले आहे.

मुंबई : एका वृद्धाचे अपहरण करून त्यांना लुबाडण्याचा प्रकार कांजूरमार्गमध्ये घडला होता. या प्रकरणी तीन जणांच्या मुसक्या आवळण्यात गुरुवारी पोलिसांना यश आले आहे. संभाजी गोलतकर (६२) असे अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कांजूरमार्ग येथे ते वास्तव्य करतात. २ जुलै रोजी गोलतकर सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. तेव्हा काही अज्ञात इसमांनी त्यांना जबरदस्ती रिक्षात बसविले आणि त्यांचे अपहरण करत त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू काढून घेतल्या. त्यानंतर त्यांना सोडून देत ते पसार झाले. या घटनेनंतर त्यांनी ही माहिती कांजूरमार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी यावर अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचच्या युनिट ८कडे सोपविण्यात आला होता. त्यानुसार या ब्रांचचे प्रमुख पंढरीनाथ व्हावळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गावशेते आणि सहकारी काम करत होते. या तपासादरम्यान आरोपी हे अंधेरी चांदीवली परिसरातील असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार या परिसरात सापळा रचून व्हावळ यांच्या पथकाने महेश उर्फ मन्या मोहिते, इलियास उर्फ इल्या शेख आणि जनार्दन उर्फ जन्या लाड यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. तेव्हा गोलतकर यांच्या अपहरणाची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर या तिघांना कांजूरमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.