मुंबई - खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीवर (Motoshree) जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावरून मातोश्री बाहेर जोरदार राडा रंगला होता. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीमुळे आणि शिवसैनिकांची आक्रमक भूमका यामुळे राणा दाम्पत्याने आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या दौरा असल्याने, या दौऱ्यास कुठलंही गालबोट लागू नये, म्हणून आपण आंदोलन मागे घेतल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं.
मुंबईत आज नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठाम होते. त्यावरुन, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी राणा दाम्पत्याव टिका केली. याच दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राणा दाम्पत्यावर टिका केली. तर, शिवसैनिकांच्या संयमाचंही उदाहरण दिलं. राणा दाम्पत्य हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
तेव्हापासून शिवसेना प्रचंड मवाळ - पाटील
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना आता प्रचंड मवाळ झाली आहे. कायम आक्रमक असणारा शिवसैनिक आता शांत, संयमी नबला आहे. मात्र, जर कोणी तुमच्या घरापर्यंत येत असेल तर काय, हा नवा पायंडा पडत आहेत. नेत्यांच्या घरावरच येऊन हल्लाबोल करायचा. माझ्या मते शिवसैनिकांनी प्रचंड संयम बाळगला आहे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, नवनीत राणा यांच्या हनुमान चालिसा पठण आंदोलनावरुन राणा यांच्यावर पाटील यांनी खोचक टिका केली. तर, शिवसेनेच्या भूमिकेचं एकप्रकारे स्वागतच केलं आहे.
तपास करणे आवश्यक - पाटील
मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ल्याच्या संदर्भात देखील जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पाटील म्हणाले की, कोणाच्याही गाडीवर असा हल्ला करणे योग्य नाही. तो हल्ला कोणी केला, याबाबत तपास करणे गरजेचे असल्याचे जयंत पाटील म्हणाले. सिग्नलला गाडी उभी राहिल्यावर हल्ला करणे, त्यानंतर ती गाडी निघून जाणे हे सगळ जरा व्यवस्थित तपासले पाहिजे असे जयंत पाटील यांनी सांगितले.