मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवारांच्या गटात जाणार असल्याच्या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, पाटील यांनी जाहीरपणे मी कुठेही जाणार नाही, मी शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पण, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्यामुळेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचं म्हटलं. तसेच, ते शरीराने तिकडे पण मनाने अजित पवारांसोबत असल्याचंही ते म्हणाले. त्यावर, जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
संजय शिरसाट देखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. परंतू, शिंदे सरकारच्या दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होऊनही शिरसाटांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. आणखी एक विस्तार होणार अशी गेल्या चार-सहा महिन्यांपासून आवई उठविली जात आहे. परंतु, काही केल्या हा विस्तार होत नाही. यासंदर्भात संजय शिरसाट यांनी जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा दावा केला होता. त्यावर, जयंत पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिल्यानंतर पुन्हा एकदा संजय शिरसाटांनी पुरावे देण्याची भाषा केली आहे.
जयंत पाटलांनी छातीवर हात ठेऊन सांगावं हे खरं की खोट?, असा सवाल शिरसाट यांनी केला. खोटं बोल पण रेटून बोल ही पद्धत आता बंद करा, लोकं उघड्या डोळ्याने तुमची सगळी कृती पाहात आहेत. मी केलेलं विधान १०० टक्के खरं होतं. मी हे छातीठोकपणे सांगेन, पण त्यांना आवश्यक वाटत असले तर मी अनेक पुरावे द्यायला तयार आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते शिरसाट
जयंत पाटील हे भाजपासोबत येणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार थांबला होता. भाजपासोबत जाण्याचा प्रस्तावच जयंत पाटलांनी मांडला होता. आमदार आणि आपण सर्व सोबत जाऊन शरद पवारांना हे सांगू अशी चर्चा ही केली होती. आजही पाटील हे शरीराने शरद पवारांसोबत आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला. शिरसाट यांच्या या गौप्यस्फोटावर स्वत: जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली. "संजय शिरसाट यांनी विधान केलं आहे, याचा खुलासा त्यांनाच विचारा. ज्यांनी विधानं केली आहेत त्यांनाच विचारलं पाहिजे. मी याबाबत अनभिज्ञ आहे. मनाने इकडे आणि शरिराने तिकडे असं भासवणारी लोक मनाने इकडे पण आहेत. ते असं चालूच असतं. त्यांनीच आता याबाबत खोलात जाऊन सांगायला पाहिजे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता.