मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध महाराष्ट्र सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीवेळी ही याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे, राज्य सरकार आणि अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. त्यातच, सचिन वाझे याने पत्र लिहून अनिल देशमुख आणि अनिल परब यांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.
सचिन वाझेंच्या पत्रानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच चिघळलं असून अनिल परब यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. याप्रकरणी जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. मूळ प्रकरण हे मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकाने भरलेली गाडी कोणी ठेवली याचं होतं. दुसरं, मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचं होतं. मग, हे तिसरीकडेच जात आहेत. त्यातही, जो एवढ्या गंभीर प्रकरणात आरोपी आहे, त्याच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार, असे जयंत पाटील यांनी म्हटलंय.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा हा डाव आहे. भाजपा बोलतेय तशीच चौकशी एनआयएकडून होत आहे, असे म्हणत सचिन वाझेचा म्होरक्या कोण?, असा प्रश्न पाटील यांनी विचारला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळल्याने सरकारवर चौकशीची नामुष्की ओढवली आहे.
मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यावर, सीबीआयने १५ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत ६ एप्रिलला सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या. या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही करण्यात आली होती.
दोघांचीही चौकशी करा
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी न्या. संजय कौल यांनी मोठं निरीक्षण नोंदवलं आहे. ''आरोप करणारा तुमचा शत्रू (अनिल देशमुख) नव्हता, उलट राईट-हँडच (परमबीर सिंग) होता. त्यामुळे दोघांची चौकशी झालीच पाहिजे'' असे निरीक्षण न्या. संजय कौल यांनी नोंदवत खडेबोल सुनावले आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आरोप करणारे तुमचे (अनिल देशमुख) शत्रू नव्हते, पण आरोप अशा व्यक्तीने केले आहेत जो जवळपास तुमचा राईट हॅण्ड माणूस (परमबीर सिंह) होता असं निरीक्षण नोंदवलं आहे. तसंच अनिल देशमुख आणि परमबीर सिंह या दोघांचीही चौकशी झाली पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालायने नोंदवलं आहे.