Jayant Patil ( Marathi News ) : राज्य सरकार आता सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'विशेष प्रसिद्धी मोहिम' राबवणार आहे. या योजनेसाठी २७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या माध्यम आराखड्यास आणि त्यासाठी लागणाऱ्या 270 कोटी पाच लाख रुपयांच्या अंदाजित प्रशासकीय खर्चाला सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली. दरम्यान, आता यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
'मातोश्री'बाहेर मराठा समाजाचं आंदोलन; अंबादास दानवे बोलले, ही भाजपाची माणसं, तर...
"नुकताच राज्य सरकारने एक शासन आदेश जारी करुन शासकीय योजनांसाठी २७० कोटी रुपये खर्च करणार आहे. खरंतर ही शासकीय योजनांची विशेष प्रसिद्धी मोहिम असं दिसत नाही. ही निवडणुकीची प्रसिद्धी मोहिम आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही, असा टोलाही आमदार जयंत पाटील यांनी लगावला. आपला स्वत:चा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर करत असल्याचं दिसत आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
"निवडणुकांच्या निकालाचा अंदाज आल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आहे. म्हणूनच हा खटाटोप केला जात आहे. सत्ताधारी स्वतःची जितकी प्रसिद्धी करतील तितका सामान्य जनतेच्या मनात त्यांच्याबद्दलचा राग वाढत जाईल, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. स्वत:ची प्रसिद्धी करुन जनतेसमोर राहण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज राज्याची परिस्थिती काय आहे? एसटी महामंडळाची अवस्था वाईट आहे. शेतकऱ्यांची अवस्थाही तशी आहे. राज्यावर आठ लाख कोटींवर कर्ज आहे. तरीही आता हे जाहिरातीवर खर्च करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने आता यावर विचार केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष याचा निषेध करतो, असंही जयंत पाटील म्हणाले.
'विशेष प्रसिद्धी मोहिम' काय आहे?
राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन झाले. या अधिवेशन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी त्यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण', 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन', 'महिलांना वर्षाला तीन मोफत सिलेंडर गॅस अशा गेमचेंजर योजना सुरू केल्या. आता या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'विशेष प्रसिद्धी मोहिम' सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून २७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.