मुंबई- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील ३६ गावांवर दावा केला आहे. यावरुन विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली, दोन्ही राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनात कर्नाटक सरकारने बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या बेळगाव वादाचा निषेध करण्याचा करण्याचा ठराव’ केला, यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ट्विट करुन शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक राज्याच्या विधानसभेत ‘बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या बेळगाव वादाचा निषेध करण्याचा करण्याचा ठराव’ करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री साप चावल्याप्रमाणे गप्प बसले आहेत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
'मराठी भाषिकांवर अन्याय होऊनही महाराष्ट्राचे शिंदे- फडणवीस सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही बाहेर निघत नाहीये, असंही जयंत पाटील यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
'मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आता तरी नेभळटपणा सोडून आपल्या विधानसभेत कर्नाटकच्या सरकार आणि मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधाचा ठराव मांडावा, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. 'कर्नाटक राज्याच्या येणाऱ्या निवडणुकांतील भाजपचा विजय हा शिंदे फडणवीस यांना जास्त महत्वाचा वाटत आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी ट्विटमधून लगावला आहे.
काल सभागृह नेमकं काय घडलं?
काल सभागृहात दिशा सालियन प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली, यावेळी दालनात विरोधकांना बोलू देत नसल्याचा आरोप विरोधी पक्षातील सदस्यांनी केला. यावेळी विरोधी पक्षातील सदस्य दालनात उतरले, आणि गोंधळ सुरू झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्याचा आरोप सत्ताधारी गटातील सदस्यांनी केला आहे.