मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाच्यावतीने पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन होत आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे दोन दिवसीय शिबीर संपन्न होत असून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी येथे भाषण केली. त्यावेळी, आपणच खरी राष्ट्रवादी असल्याचे सांगत अजित पवारांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं. येथील शिबिरात आज अजित पवार यांचं भाषण झालं. त्यावेळी, त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तर, जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा शब्द पाळला नसल्याचं उदाहरणही दिलं.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मीडिया आणि पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू झालीय. परंतु ५ राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पुन्हा चर्चा होईल. आपण आपल्याकडे असणाऱ्या ४ जागा लढवणारच आहोत त्यासोबत अन्य जागांवरही निवडणूक लढवू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी एकत्र असतानाचा घडलेला किस्सा सांगत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शब्द पाळला नसल्याचे म्हटले.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या नाराजी किस्सा सांगत जयंत पाटलांवर निशाणा साधला. महाविकास आघाडीचं सरकार बनल्यानंतर अनेकांनी मंत्रीपदाची संधी देण्यात आली. मात्र, आमदार प्रकाश सोळुंके यांना ती संधी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. त्यावेळी, त्यांनी राजीनामाही देऊ केला. मात्र, आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करुनही मला का डावललं जातं असा त्यांचा प्रश्न होता. अखेर, त्यांची समजूत काढून मी व जयंत पाटील यांनी त्यांना शब्द दिला होता. १ वर्षानंतर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरुन कार्यमुक्त होतील आणि कार्याध्यक्ष असलेल्या प्रकाश सोळुंके यांना प्रदेशाध्यक्ष केलं जाईल, असे ठरले. त्यामुळे, प्रकाश सोळुंके यांची नाराजी दूर झाली. मात्र, १ वर्षे गेले, २ वर्षे गेले तरीही जयंत पाटील त्या पदावरुन हटले नाहीत. प्रकाश सोळुंके यांना दिलेला शब्द पाळला जात नव्हता. याबाबत, मी त्यांना सांगितलं होतं, वरिष्ठांची मर्जी नसल्याचं त्यांनी म्हटलं.
पक्षात जर अशाप्रकारे काम होत असेल तर कार्यकर्ते नाराज होतील. शब्द पाळला पाहिजे, शब्द देताना १० वेळा विचार करावा, पण शब्द पाळावा, असे म्हणत अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठीचा ठरलेला किस्सा जाहीर सभेत सांगितला.