Ajit Pawar Vs Sharad Pawar: अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही आमदार अजित पवार गटासह सत्तेत सहभागी झाले आहेत. तर काही आमदार शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले जात आहेत. अशातच पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. सलग दोन दिवस अजित पवार गटातील नेते आणि मंत्री शरद पवार यांच्या भेटीला जात असून, त्यांची मनधरणी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीत काय झाले, याबाबत जयंत पाटील यांनी माहिती दिल्याचे सांगितले जात आहे.
मीडियाशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ती सगळी मंडळी शरद पवार यांना भेटली. त्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. शरद पवार यांना भेटून काल नऊ मंत्र्यांनी जी विनंती केली होती, त्याच विनंतीचा पुन्हा एकदा त्यांनी पुनरुच्चार केला. शरद पवार यांनी त्यांची विनंती ऐकून घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधात आहे. आमचे सर्व आमदार अधिवेशनावेळी विरोधी पक्षांबरोबरच बसले होते. तिथेच त्यांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेतील नऊ सदस्यांनी सरकारमध्ये शपथ घेतली आहे. तुम्ही अधिवेशनातली व्यवस्था पाहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य विखुरले होते. काही जण विरोधी पक्षांच्या बाजूला बसलो होते, तर काहीजण सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसले होते. कोणीही शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका याआधी स्पष्ट केली आहे. तसेच येवल्यातल्या सभेतही त्यांनी त्यांची भूमिका मांडली होती. त्यामुळे रोज त्यांना कोणीतरी भेटल्यावर त्यांनी आपली भूमिका नव्याने स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, सर्व आमदार शरद पवार यांना भेटायला आल्यावर शरद पवार यांनी मलाही बोलावले. मी नुकताच राज्यपाल महोदयांना भेटून घरी गेलो होतो. तेवढ्यात मला शरद पवार यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितले ताबडबोत या. भेटीसाठी आमदार आले आहेत. शरद पवार यांना विनंती केली की मला तिथे पोहोचायला उशीर होईल, तुम्ही त्यांना भेटून घ्या. पण ते मला म्हणाले की, तुम्ही आल्याशिवाय मी कोणालाही भेटणार नाही. मला तिथे पोहोचायला वेळ झाला. परंतु तेवढा वेळ ते तिथेच बसले होते. त्यांनी आमदारांची भेट घेतली नव्हती. मी आल्यानंतर त्यांनी भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल शंका घेण्याची गरज नाही, असे जयंत पाटील यांनी नमूद केले.