Join us  

Jayant Patil: "शिवाजी महाराजांप्रमाणे एकनाथ शिंदेंनीही थेट बाहेर पडायला हवं होतं"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 11:08 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी NITI आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीदिल्लीवारी सध्या चांगलीच चर्चेत असते. कधी मंत्रिमंडळ विस्तारामुळे, कधी आरक्षणासाठीच्या दौऱ्यांमुळे तर कधी दिल्ली दरबारी पंतप्रधानांची भेट न झाल्यामुळे. आता, निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या मान-सन्मानामुळे त्यांची दिल्लीवारी चर्चेत असून त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते, केंद्रीयमंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री दिसून येत आहेत. मात्र, या रांगेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात शेवटच्या रांगेत असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील प्रसंगाचंच उदहारण दिलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी NITI आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला होता. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. त्यांचा या बैठकीदरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरुन, या राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन खोचक टोला लगावला आहे. आता, जयंत पाटील यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देताना, एकनाथ शिंदेंनी बाहेर पडायला हवं होतं, असे म्हटलंय. 

जयंत पाटील यांना या प्रसंगाची तुलना थेट औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील ऐतिहासिक भेटीसंदर्भात केली. औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज यांना दुसऱ्या रांगेत स्थान देण्यात आले होते. तेव्हा, शिवाजी महाराजांनी तिथून बाहेर पडायचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांनीही बाहेर पडणे गरजेचे होते, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, मी केवळ उदाहरण सांगितलं. मी कुणालाही औरंगजेबाची उपमा दिली नाही. ती सभा मोदींची होती, मला नवा वाद उभा करायचा नाही. प्रोटोकॅाल नुसार अल्फाबेट नुसार अरेंजमेंट असते, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी अमोल मिटकरी यांनीही ट्विट करुन हेच उदाहरण देत एकनाथ शिंदेवर खोचक टीका केली आहे. 

अमोल मिटकरी म्हणाले

"दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा" हा इतिहास ज्या महाराष्ट्राचा त्याचे स्थान शेवटच्या रांगेत आणि शिवप्रभुंचा स्वाभिमान जेथे उफाळुन आला तो आग्रा दरबार (उ.प्र.) पहिल्या रांगेत? प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा हा फोटो आहे, शिंदे साहेब वाईट वाटले असे ट्वीट आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. 

टॅग्स :जयंत पाटीलएकनाथ शिंदेनरेंद्र मोदीदिल्ली