मनोहर कुंभेजकर, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटी लि. कफ-परेड, कुलाबा येथे येऊन महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली व मच्छिमारांच्या समस्या ऐकून घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मच्छिमारांच्या समस्या येत्या पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
पावसाळी हंगामात मासेमारी करण्यास बंदी असताना पर्ससीन एलईडी व टाॅलर्स नौकांच्या मार्फत विनाशकारी अवैध मासेमारी करीत असून मत्स्यव्यवसाय विभाग कारवाई करत नसल्याची लेखी तक्रार समितीने दिली आहे. जर या पद्धतीने विनाशकारी मासेमारी चालू राहिली तर सन २०३२ पर्यंत समुद्रात मासे शिल्लक राहणार नाहीत असे शिष्टमंडळाने सांगितले. याबाबत मत्स्यव्यवसाय खाते झोपेचे सोंग करित असल्याचे सांगितले. मंत्री महोदयांनी सांगून कारवाई होत नाही. राज्या करिता हि लाजिरवाणी गोष्ट आहे अवैध मासेमारीला नकळत मत्स्यव्यवसाय खात्याचा छुपा पाठिंबा आहे काय? याची देखील चौकशी झाली पाहिजेअशी मागणी आमदार जयंत पाटील यांच्या कडे केल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी दिली.
तमासेमारी बंदी कालावधीत मच्छिमारांना, त्याच्या कुटूंबीयांना व मासेमारी व्यवसायावर अवलूंबून असलेल्या कुटूंबीयांना निर्वाह भत्ता( खावटी ) राज्य सरकारने सुरु करावा. बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारी बंद करावी. शेतक-यांना दोन अर्थसंकल्पा मध्ये कर्ज माफी व सवलती मध्ये प्रत्येक वर्षी ३२ हजार कोटी तरतुद करुन दिले. त्याच धर्तीवर मच्छिमारांचे एनसीडीसी व बॅंकांचे व्याजा सह कर्ज माफ करावीत. इत्यादी समस्यांवर चर्चा केली.
जयंत पाटील यांनी वरील सर्व समस्यांचे गांभीर्याने दखल घेऊन मच्छिमारांना न्याय देण्यासाठी पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा, लक्ष वेधी, तारांकीत प्रश्न उपस्थित करुन मच्छिमारांना न्याय देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
सदर शिष्टमंडळात महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, उपाध्यक्ष, मोरेश्वर पाटील, खजिनदार परशुराम मेहेर, सदस्य जयेश भोईर, भुवनेश्वर धनु, प्रफुल तांडेल, भास्कर तांडेल, जयंत तांडेल, दत्ताराम मेहेर,प्रवीण तांडेल, गीता धनू, नागेश तांडेल, जितेश धनू व कफ- परेड येथील नाखवा आदी मान्यवर उपस्थित होते.