Join us

आ. जयंत पाटील, नृपाल पाटील यांचा मंत्रालयात जाहीर सत्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 8:52 PM

आ. जयंत पाटील यांच्यासह पीएनपी इफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि.चे डायरेक्टर नृपाल पाटील व कंपनीतील कर्मचार्‍यांचा सत्कार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनात करण्यात आला.

- जयंत धुळप अलिबाग  - शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभासाठी बुधवारी सायंकाळी निघालेली बोट खडकावर आदळून बुडाली होती. त्यावेळी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या सतर्कतेमुळे तसेच पीएनपी बोटीमुळे 22 जाणांचे प्राण वाचले. आ. जयंत पाटील यांच्यासह पीएनपी इफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि.चे डायरेक्टर नृपाल पाटील व कंपनीतील कर्मचार्‍यांचा सत्कार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनात करण्यात आला.

यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आ. पंडित पाटील, आ. बाळाराम पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर,  स्विय सहाय्यक श्रीनिवास जाधव, अलिबागच्या प्रांत शारदा पोवार, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, सवाई पाटील आदींसह मंत्रालयामधील विविध खात्यातील  अधिकारी उपस्थित होते. 

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, राज्याचे मुख्य सचीव डी. के. जैन यांच्यासह अनेक अधिकारी, पत्रकार मुंबईहून स्पीड बोटींनी बुधवारी निघाले होते. आ. मेटे व सचिव जैन असलेली पहिली बोट पुढे निघाल्यानंतर दुसर्‍या बोटीत पत्रकार व काही अधिकारी होते. दुसरी स्पीडबोट समुद्रातील दिपस्तंभाजवळील खडकावर आदळली. त्यामुळे बोटीला मोठे छिद्र पडल्याने आत पाणी भरू लागले. बोटीतील अधिकारी श्रीनिवास जाधव यांनी आ. जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. आ. जयंत पाटील यांनी तातडीने पीएनपीच्या बोटींना पाचारण केले. पीएनपीची बोट घटनास्थळी पोहचून बुडत असलेल्या बोटीतील प्रवाशांना तात्काळ पीएनपी बोटीमध्ये घेतले. पीएनपी बोट वेळेवर पोहचल्याने बोटीतील 22 प्रवासी बचावले. बोटीच्या अपघातातून बचावलेल्यांनी पीएनपी व आ. जयंत पाटील यांच्या तत्पर मदतीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. सर्वत्र स्तरातून आ. जयंत पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. 

सार्वजनिक बांधकाम, महसूल मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई येथील मंत्रालयातील त्यांच्या दालनात आयोजित कार्यक्रमात आ. जयंत पाटील, पीएनपी इफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि.चे डायरेक्टर नृपाल पाटील, जनरल मॅनेजर मिना डिसूजा, सचिन टिपणीस, बोटीतील कप्तान एजाज चौगूले, मोफीजूल मंडळ, सिमेन आदींचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

टॅग्स :मुंबईमंत्रालय