Join us  

Jayant Patil: "लोकं मनोरंजन म्हणून पाहतात, राज ठाकरेंची सभा उत्तर देण्यासारखी नाहीये"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 1:29 PM

मी माझ्या ट्विटमधून माझं म्हणणं थोडक्यात मांडलं आहे

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या मनसेच्या उत्तर सभेत शरद पवारांपासून ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत अनेक नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी, जयंत पाटलांचा जंत पाटील असा उल्लेख त्यांनी केला. तसेच, जंत पाटलांना काहीही सांगा ते नेहमी चकीतचंदू असतात, असा टोलाही लगावला. राज यांच्या भाषणानंतर जयंत पाटील यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलंय. ''वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत'', असे म्हणत पलटवारही केला. त्यानंतर, पुन्हा पत्रकारांशी बोलताना राज यांची सभा लोकांसाठी मनोरंजन होती, असेही ते म्हणाले.  

मी माझ्या ट्विटमधून माझं म्हणणं थोडक्यात मांडलं आहे. राज ठाकरे हे बोलमोहन विद्या मंदिरचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे त्यांचं र्हस्व, दिर्घ, काना, मात्र पक्क आहे. तरीही विद्यार्थ्याने चूक केलीय. त्यामुळे, आता बालमोहन विद्या मंदिरलाच विचारावं लागेल की, व्याकरण विसलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा वर्ग सुरू करायची काय व्यवस्था आहे का? असे म्हणत जयंत पाटील यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली. या सभेला राष्ट्रवादी उत्तर देणार का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देण्यासारखी ही सभा नव्हती. त्यामुळे, उत्तर देण्यासारखं असं काही मला वाटत नाही. शेवटी, लोकंदेखील थोडसं मनोरंजन म्हणूनच ते पाहतात, असे जयंत पाटील यांनी म्हटलं. 

राज ठाकरेंनी २०१४ ला मोदींना पाठींबा दिला, २०१९ ला मोदींना विरोध केला. आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर घेतली आहे. वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची. तर, पुतण्या बाळासाहेब ठाकरेंचा, मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी असल्याची घणाघाती टीका पाटील यांनी केली आहे. तसेच, वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले. 

काय म्हणाले होते राज ठाकरे

जयंत पाटील गृहमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं, एकदा बेहराम पाड्यात जाऊन बघा, भीषण अवस्था आहे. तिकडे शस्त्र असतील, बॉम्ब असतील. हे नेहमी आश्चर्यचकीत असतात, यांना काहीच माहिती नसतं.", असे म्हणत राज यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला होता. त्यानंतर, पाटील यांनी ट्विट करुन राज यांच्यावर पलटवार केला. राज यांना वारसा प्रबोधनकारांचा पण विचारसरणी नथुराम गोडसेंची असल्याची घणाघाती टिका पाटील यांनी केली आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेजयंत पाटीलमुंबई