Jayant Patil And Ajit Pawar News: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासह, अवकाळी पाऊस, देवेंद्र फडणवीसांवर झालेले आरोप अशा अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक पत्र लिहिले होते. या पत्राचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सूचक विधान केले.
अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलत असताना जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या पत्राचा उल्लेख केला. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले. ते म्हणाले की, सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही. हे खरे आहे, सत्ता असल्याशिवाय विकास करता येत नाही. पण विकासाला तत्त्वांची झालर असली पाहिजे. विकासाला काही धोरण असले पाहिजे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
आपली तुलना कुणाशी करायची? याचे भान...
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवार यांचे पत्र महाराष्ट्राच्या जनतेला आहे. पण त्यात ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासारखी माझी कामाची शैली आहे. आमचे त्याबाबत दुमत नाही. पण दुसऱ्यांची हरकत येऊ शकते. आपली तुलना कुणाशी करायची? याचे भान तिकडे गेल्यावर ठेवण्याची गरज आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण भाषणात कुठेही शाहू–फुले–आंबेडकर यांचे नाव घेतलेले नाही, ही चिंतेची बाब आहे. योजनांच्या नावांपलीकडे कुठेही उल्लेख नव्हता. विचार सोडून जर विकास होत असेल तर त्याला फारसा अर्थ नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
दरम्यान, तरुणांच्या हाताला काम कसं देणार याचाही यात उल्लेख नव्हता. बुलेट ट्रेनचा फायदा अहमदाबाद व गुजरातला होणार हे जगजाहीर आहे तरी आपण सहन करतो. कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी सरकारने एक चकार शब्द काढला नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर आहे, हे या अर्थसंकल्पातून कुठेच दिसत नाही. रुग्णवाहिकेसाठी १०८ ची योजना सुरु असताना नवी योजना कशासाठी? या सर्व गोष्टी आपण कुठेतरी दुर्लक्षीत करत आहोत. वाढवण बंदर करत असताना स्थानिकांना विश्वासात घेऊन करा. विकासाला काही धोरण व काही तत्व असले पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले.