Join us

बांग्लादेश मुक्ती संग्रामातील मोदींच्या सहभागावर 'जयंत पाटील स्टाईल' टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 3:37 PM

बांग्लादेशच्या दौर्‍यावर असताना बांग्लादेश मुक्ती लढ्यात सहभागी झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची समाजमाध्यमातून जोरदार खिल्ली उडविण्यात आली

ठळक मुद्देपंतप्रधानांच्या या वक्तव्यावर भाष्य करताना, आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा ! असा खोचक टोला पाटील यांनी लगावला.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांग्लादेश मुक्ती संग्रामातील सहभागावरील विधानावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या स्टाईलमधये मोदींवर टीका केलीय. आपले पंतप्रधान बांग्लादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणत्या पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासियांचा लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन लगावला. 

बांग्लादेशच्या दौर्‍यावर असताना बांग्लादेश मुक्ती लढ्यात सहभागी झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची समाजमाध्यमातून जोरदार खिल्ली उडविण्यात आली. आता, मंत्री जयंत पाटील यांनीही मोदींच्या त्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर भाष्य करताना, आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा ! असा खोचक टोला पाटील यांनी लगावला.

"बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान बोलताना म्हटलं होतं. बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या ५० व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आले. या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असंही ते म्हणाले होते. बांगलादेश आणि भारतातील संबंध आणखीन दृढ होतील. येथील नागरिकांचे मन आणि विश्वास दोन्ही भारताने जिंकले आहे, असेही मोदींनी बांग्लादेश दौऱ्यात म्हटले आहे. मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर त्यांची चांगलीच खिल्ली उडविण्यात आली. या विधानावरुन अनेक मिम्सही व्हायरल झाले आहेत. यावरून एमआयएचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

नाना पटोले अन् असुदुद्दीन औवेसींचीही टीका

"पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यसाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. जर बांगलादेशसाठी त्यांनी सत्याग्रह केला होता, मुर्शिदाबादच्या लोकांना ते बांगालादेशी का म्हणतात," असा सवाल ओवेसी यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनीही पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले यांनी मोदीजी अजून किती फेकणार अशी विचारणा केली आहे. "अजून किती फेकणार मोदीजी, हद्द झाली राव. शेतकरी आंदोलनावर एक शब्दही तुमच्या तोंडून निघाला नाही आणि स्वातंत्र्याबद्दल बोलण्यासाठी बांगलादेशला जाता. तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होतात. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी" असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणतात...

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही यासंदर्भात आपलं मत मांडलं आहे. मी लहान होतो त्यामुळे सांगता येणार नाही मोदींनी बांग्लादेश निर्मितीवेळी आंदोलनात भाग घेतला का नाही, असे आंबडेकर यांनी म्हटलं.

टॅग्स :नरेंद्र मोदीजयंत पाटीलबांगलादेश