Jayant Patil: 'शरद पवारांचा विचार मानणारा माणूस नाही, असं एकही गाव महाराष्ट्रात नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 02:45 PM2022-04-02T14:45:41+5:302022-04-02T14:46:27+5:30
शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादीत घरवापसी झाल्यानंतर राष्ट्रवादी नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
मुंबई - माजी मंत्री आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते शिवाजीराव नाईक यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप करत त्यांनी राष्ट्रवादीत घरवापसी केली. केवळ शरद पवार हेच महाराष्ट्राचा विकास करू शकतात, असंही नाईक यांनी म्हटलं. या पक्षप्रवेश कार्यक्रमास खुद्द शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी, शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. राज्यातील प्रत्येक गावात पवारांच्या विचारांचा माणूस असल्याचं, जयंत पाटील यांनी म्हटले.
शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादीत घरवापसी झाल्यानंतर राष्ट्रवादी नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. "1995 साली शिवाजीराव नाईक विधानसभेत निवडून गेले. अनेकवेळा यश मिळालं, काही वेळा अपयशही आलं. पण, त्यांनी काम थांबवलं नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वावर संपूर्ण राज्यभरात विश्वास आहे.
मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो. असा एकही जिल्हा नाही, गाव नाही तिथे पवार साहेबांचे विचार मानणारा माणूस नाही. प्रश्न भरपूर आहेत, मात्र ते सोडवण्यासाठी चांगला मार्गदर्शक पाहिजे. आणि पवार साहेबांच्या रुपाने आमच्याकडे अवघे विद्यापीठ आहे. @PawarSpeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 2, 2022
''मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो. असा एकही जिल्हा नाही, गाव नाही तिथे पवार साहेबांचे विचार मानणारा माणूस नाही. प्रश्न भरपूर आहेत, मात्र ते सोडवण्यासाठी चांगला मार्गदर्शक पाहिजे. आणि पवार साहेबांच्या रुपाने आमच्याकडे अवघे विद्यापीठ आहे.'', असेही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले. पवार साहेबांनी मला जलसंपदा विभागाची जबाबदारी दिली. जलमय महाराष्ट्र हे आमचे उद्दिष्ट आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, शिराळा ज्या ज्या भागात पाण्याची कमतरता आहे, ती कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच सर्वात मोठा पक्ष
गुढीपाडव्याच्या दिवशी नाईक यांचे स्वागत करत असताना आनंद होतोय. भाजपसारखं, रोज म्हणत मंत्री फुटणार, आमदार फुटणार असं आम्ही बोलत नाही, तर काम करतो. येणाऱ्या निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समोर आल्याशिवाय राहणार नाही.