Join us  

अजित पवार राष्ट्रवादीच्या शिबिराला गैरहजर का राहिले? जयंत पाटलांनी सांगितले कारण, म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 8:32 PM

दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे शिबीर सुरू होते. आज या शिबिराचा शेवटचा दिवस होता. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या शिबिराला उपस्थिती लावली.

दोन दिवसापासून राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे शिबीर सुरू होते. आज या शिबिराचा शेवटचा दिवस होता. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या शिबिराला उपस्थिती लावली. गेल्या चार दिवसापासून खासदार शरद पवार रुग्णालयात उपचार घेत आहेत. तरीही त्यांनी आज शिबिराला उपस्थिती लावली. पण, विरोधी पक्षनेते अजित पवार या शिबिराला गैरहजर होते, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात अजित पवार गैरहजर का आहेत याचे स्पष्टीकरण दिले.

आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभेच्या १०० जागा निवडून आणण्याचा नारा दिला आहे. आम्ही जास्तीत जास्त जागा लढवणार असल्याचे पाटील म्हणाले, त्यामुळे चर्चांना उधाण आले. 

गेल्या दोन दिवसापासून शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर सुरू आहे. या शिबिराला राज्यभरातून राष्ट्रवादीचे नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गैरहजेरी लावली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसेचे नेते गजानन काळे यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. 

"आदरणीय पवार साहेब तब्येत ठीक नसताना राष्ट्रवादीच्या शिबिरात येतात व अजितदादा बरोबर त्याचवेळी वैयक्तिक कारण सांगून अनुपस्थित राहतात. ही बाब काही पचनी पडत नाही.तसेही दादा विरोधी पक्षनेते म्हणून शांत आहेत काही दिवसांपासून.गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून रहा रे. कूछ तो गडबड हैं." असं ट्विट गजानन काळे यांनी केले आहे, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

दरम्यान, जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात अजित पवार गैरहजर का राहिले यावर स्पष्टीकरण दिले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा नियोजित दौरा होता. तो अगोदरच ठरलेला होता. ते माझ्या परवानगीने अगोदरच गेले आहेत. अगोदरच ठरल्यामुळे त्यांनी आम्हाला विनंती केली. त्यामुळे ते आज शिबिराला गैरहजर आहेत, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.    

शरद पवार रुग्णालयातून थेट राष्ट्रवादीच्या शिबिरात

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शदर पवार हे गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, या आजारपणामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिराला उपस्थित राहतील की नाही याबाबत साशंकता होती. मात्र शरद पवार हे थेट रुग्णालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरासाठी उपस्थित राहिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. दरम्यान, तब्येत साध देत नसताना शरद पवार यांनी शिबिराला लावलेल्या हजेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे.  तब्येत साथ देत नसताना कार्यकर्त्यांमध्ये जोम आणि उत्साह आला पाहिजे आणि तो माझ्यामुळेच येईल याची त्यांना कल्पना असल्यामुळे आज ते शिबीरामध्ये दाखल झाले. त्यांच्या इच्छाशक्तीला सलामच करावा लागेल, असे आव्हाड या पोस्टमध्ये म्हणतात. 

आज साहेब थेट इस्पितळातून निघून शिबीरामध्ये आले आणि परत निघून आता इस्पितळात दाखल झाले असतील. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत राजकारण करायच असतं आणि त्या प्रतिकूल परिस्थितीची दिशा बदलून ती आपल्या दिशेने वळवायची आणि त्यावरुन मार्गक्रमण करुन त्याच्यावर विजय प्राप्त करायचा हा त्यांचा स्थायी स्वभाव. आजही तब्येत साथ देत नसताना कार्यकर्त्यांमध्ये जोम आणि उत्साह आला पाहिजे आणि तो माझ्यामुळेच येईल याची त्यांना कल्पना असल्यामुळे आज ते शिबीरामध्ये दाखल झाले. त्यांच्या इच्छाशक्तीला सलामच करावा लागेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहेत. तसेच राजकारण हे २४ तास करावं लागतं. त्याच्या अधे-मधे सुट्टी घेता येत नाही. हे त्यांनी साठ वर्षे केले आणि आजही ते करीत आहेत. राजकारण हे सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत करण्याचा विषय नाही. तर सकाळी ७ ते दुस-या दिवशी सकाळी ७ म्हणजे २४ तास ३६५ दिवस करण्याचा विषय आहे हे त्यांच्या क्रियेतून ते दाखवतात, असेही आव्हाड यांनी या पोस्टमधून म्हटले आहे.

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारअजित पवार