मुंबई - एकदा गुजरातचं कौतुक करुन झालं आता युपीचं कौतुक करतील आणि महाराष्ट्र सोडून सर्व राज्याचं कौतुक करायला दौरे करतील, अशा शब्दात राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांच्या केलेल्या कौतुकावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी टोला लगावला. तसेच, दुसर्या राज्यात जाऊन त्या राज्यांचे कौतुक राज ठाकरे करतच राहणार आहेत. जोपर्यंत महाराष्ट्रात त्यांचे बंधु मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचं कौतुक करायचं नाही, असे ठरवले असेल, असे म्हणत पाटील यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे कौतुक करायचं नाही असं ठरवलं असेल तर मग दुसर्या राज्याचे कौतुक ते करणारच असा खोचक टोला जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. राज ठाकरे यांनी युपीचे कौतुक केले आहे असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तरे दिली.
शिवसेना होती म्हणून विरोध करण्याचा प्रश्न नव्हता. मुळात चर्चा झालीच नाही तर विरोध करण्याचा प्रश्न येतो कुठून. आमची काँग्रेसबरोबर आघाडी होती. आमची आघाडी विरोधी पक्षाचे काम करत होती. त्यामुळे भाजपला आमच्याशी चर्चा करायची गरज का वाटली असा उलट सवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपकडून सुरू असलेल्या युतीच्या चर्चेला उत्तर देताना केला. आमच्याशी भाजपने चर्चा का केली. त्यातून शिवसेनेला बाजूला करा असं म्हणत असू तर या सगळ्या हवेतील गप्पा आहेत. तुम्ही सत्तेत असताना तुमच्याबरोबर तुमचा मित्र पक्ष असताना तुम्ही राष्ट्रवादीबरोबर चर्चा का केली हा प्रश्न माझ्यावतीने भाजपला विचारा, असेही जयंत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
महागाईचे मूळ केंद्रात
भारतात प्रचंड महागाई वाढलेली आहे त्याचे दुष्परिणाम शेजारच्या देशात म्हणजे श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील महागाईची जबाबदारी राज्या-राज्यांवर टाकून हात झटकण्याचा प्रयत्न आहे. खरे महागाईचे मुळ केंद्रात आहे हे विसरता येणार नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी केंद्रावर निशाणा साधला.
मोदी केवळ घोषणा करतात
केंद्र सरकार कुठल्याही राज्याला आऊट ऑफ वे जाऊन फारशी मदत करु शकत नाही. योजना असतात त्या योजनांवर पैसे येत असतात. असे एकाच राज्याला जास्त पैसे देणे या ज्या घोषणा मोदीसाहेब वेगवेगळ्या राज्यात जाऊन करतात. मात्र तसं ते देऊ शकत नाहीत. पण काय करणार देशाचे पंतप्रधान बोलत असल्याने लोकं ऐकून घेतात, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.