मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते. त्यातच, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला होता. 'जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमण करतील,' असं विधान करुन संजय शिरसाट यांनी खळबळ उडवून दिली होती. अर्थात, जयंत पाटील यांनी हसत-खेळत सिरसाट यांच्या विधानावर पलटवार केला. मात्र, आता भाजपने जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे भाजपने त्याची १० कारणेही सांगितले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात वरिष्ठ नेते अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. तसेच, मला पक्ष संघटनेत काम करायचं आहे, मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी इच्छाच अजित पवारांनी बोलून दाखवली. त्यामुळे, पुन्हा एकदा राष्ट्रवादी आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यातच, भाजपने एक व्हिडिओ शेअर करत जयंत पाटील राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची १० कारणे सांगत असल्याचं म्हटलं आहे.
शरद पवारांनी जयंत पाटील यांना २०१९ साली जलसंपदा मंत्री करुन त्यांची गच्छंती केली. कारण, यापूर्वी जयंत पाटील यांनी गृहमंत्रीपद सांभाळलं होतं. उपमुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहणाऱ्या जयंत पाटलांचं स्वप्न आता कोण पूर्ण करणार. कारण, पक्षाच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची नेमणूक झालीय. तर, अजित पवार पक्षसंघटनेत येऊ इच्छितात, असे भाजपने म्हटलं आहे. तसेच, विरोधी पक्षनेते पद जयंत पाटील यांना हवं होतं, पण तेव्हाही त्यांची झोळी रिकामीच राहिली. पक्ष संघटनेच्या निवडीत जयंत पाटलांना ठेंगा मिळाला. राज्याच्या राजकारणातील निर्णय अजित पवार घेतात आणि राष्ट्रीय राजकारणाची धुरा शरद पवारांच्या हाती आहे. त्यामुळे, जयंत पाटील नाममात्र प्रदेशाध्यक्ष आहेत, असेही भाजपने १० कारणांच्या व्हिडिओ क्लिपममध्ये म्हटलंय.