मुंबई - इस्लामपूर येथील दृष्टीहीन आरजे शितल साळुंखे यांचा दृष्टिकोन जाणून घेण्याचा एक डोळस प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला. महिला दिनानिमित्त जयंत पाटील यांनी चक्क आरजे शीतल यांची मुलाखत घेतली. त्यावेळी, आपल्या कामातील अनुभवासंदर्भात प्रश्न विचारले.
जागतिक महिला दिनी मी, आपल्या दैनंदिन कामातून मोठं योगदाना देणाऱ्या आई, ताई, पत्नी आणि सर्वच महिला भगिनींना, या शक्तीपीठांना वंदन करतो, असे म्हणत जयंत पाटील यांनी शीतल साळुंखेची भेट घेण्याची आपली बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. शितलने जे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं, स्वत:च्या अंधत्वावर मात करत शितलने तिचं स्वप्न पूर्ण केलं. एक रेडिओ जॉकी बनून शीतल अतिशय चांगले काम करतेय, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
मी स्वत: अंध असल्याने नेत्रदानाचं महत्व माहित होतं. त्यामुळे नेत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करायला मला आनंद वाटतो, असे म्हणत नेत्रज्ञानासाठी जागृतीचं काम मी करत असल्याचं शितलने म्हटले. शितल आणि जयंत पाटील यांच्यात महिलांच्या समस्या आणि महिला सक्षमीकरणासाठीचा चांगला संवाद पाहायला मिळाला. याच, कार्यक्रमात काहींनी फेसबुक लाईव्हमध्येही कमेंट करुन प्रश्न विचारले. मंत्री जयंत पाटील यांनीही या कमेंटवरील प्रश्नांना उत्तर दिले.