जयंत पवार अभिवादन सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:10 AM2021-09-02T04:10:18+5:302021-09-02T04:10:18+5:30
मुंबई : समकालीन लेखक-नाटककार जयंत पवार यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी एका सभेचे आयोजन शनिवार, ४ ...
मुंबई : समकालीन लेखक-नाटककार जयंत पवार यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी एका सभेचे आयोजन शनिवार, ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता भूपेश गुप्ता भवन, लेनिनग्राड चौक, प्रभादेवी येथे करण्यात आले आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, डावे- पुरोगामी पक्ष, कला, साहित्य, नाट्य, पत्रकारिता क्षेत्रातील संस्था, संघटना आणि सहकाऱ्यांच्या वतीने ही अभिवादन सभा आयोजित केली आहे.
लोकशाहीची गळचेपी आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद शिरजोर झालेल्या काळात जयंत पवारांसारखा स्पष्ट वैचारिक भूमिका आणि सामाजिक बांधीलकी मानणारा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा बिनीचा लढवय्या गमावणे या हानीचे मोजमाप करणेही शक्य नाही. कष्टकरी वर्गाशी आणि बहुजन संस्कृतीशी सच्चे इमान ठेवत त्यांनी आपल्या नाटकांमधून कथांमधून कष्टकरी-बहुजनांच्या शोषणपीडनाचे अनेक पदरी वास्तव समोर आणले आणि शोषकाचा चेहराही लख्खपणे दाखवला. गोष्ट सांगणे ही शोषितांच्या अस्तित्वाच्या लढाईची गरज असल्याचे आणि सत्याचा निरंतर शोध हे लेखकाचे कर्तव्य असल्याचे भान बाळगणाऱ्या या लेखकाला अभिवादन करण्यासाठी ही सभा होणार आहे. ती सगळ्यांसाठी खुली आहे, असे आयोजकांनी कळवले आहे.