जयंत सावरकर व विनायक थोरात यांना राज्य शासनाचे रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 06:31 PM2018-11-05T18:31:15+5:302018-11-05T18:31:43+5:30

राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ रंगकर्मी विनायक थोरात यांची निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज केली.

Jayant Savarkar and Vinayak Thorat were given the state government's Theater Lifetime Achievement Award | जयंत सावरकर व विनायक थोरात यांना राज्य शासनाचे रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार

जयंत सावरकर व विनायक थोरात यांना राज्य शासनाचे रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार

Next

मुंबई : राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ रंगकर्मी विनायक थोरात यांची निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. रुपये ५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालिका स्वाती काळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षा कीर्ती शिलेदार तसेच फैय्याज, जनार्दन लवंगारे, रवींद्र लाखे, निर्मिती सावंत, अरुण नलावडे, राजन ताम्हाणे आणि डॉ. वंदना घांगुर्डे हे सदस्य आहेत.

जयंत सावरकर यांची वयाच्या विसाव्या वर्षांपासून अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. जयंत सावरकर यांनी नोकरी सोडून पूर्णपणे नाटकातच काम करण्यास सासरे नटवर्य मामा पेंडसे यांचा विरोध असल्यामुळे नोकरी सांभाळून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द अथक मेहनतीने घडवली. नाट्यसृष्टीमध्ये पदार्पण केल्यानंतर सुरुवातीची दहा वर्षे त्यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले. त्यानंतर विजय तेंडुलकर लिखित माणूस नावाचे बेट या नाटकामध्ये प्रथमच सावरकर यांना प्रेक्षकांसमोर कला सादर करण्याची संधी मिळाली.

अनंत दामले, केशवराज दाते, जयराम शिलेदार, मा. दत्ताराम, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर अशा दिग्गजांपासून मंगेश कदम, अद्वैत दादरकर अशा नव्या दमाच्या दिग्दर्शकांसोबत जयंत सावरकर यांनी काम केले आहे. जयंत सावरकर यांनी आकाशवाणी केंद्रातही काम केले होते. आचार्य अत्रे यांच्या सम्राट सिंह या नाटकात त्यांनी विदुषकाची भूमिका साकारली आणि ती प्रचंड गाजली होती.

पं. विनायक थोरात यांचे वडील रेल्वेत नोकरी करीत असताना अहमदनगर येथील दौंड येथे वास्तव होते. त्यांनी तबल्याचे शिक्षण सुरुवातीला वडिलांकडे, नंतर यशवंतबुवा निकम यांच्याकडे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. रामकृष्णबुवा पर्वतकर यांच्याकडे पुढील शिक्षण झाल्याने ताल, लय, सूर पक्के होऊन लयीचे ज्ञान भरपूर मिळाले. सोलो वादनाचे कार्यक्रम सुरू असताना शिलेदारांच्या सहवासात आल्यावर संगीत नाटकांना साथ करायला सुरुवात केली.

आदर्श तबला साथ असं त्यांच्या साथीचं वर्णन केलं जाते. वयाच्या ५ व्या वर्षांपासून पहिली साथ केली जितेंद्र अभिषेकी, व्हायोलिन वादक डी.के.दातार, पं.भीमसेन जोशी, छोटा गंधर्व, मोगुबाई कुर्डीकर, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, किशोरी आमोणकर, राम मराठे, मालिनी राजूरकर, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांना तबला साथ करण्याचे भाग्य त्यांना मिळाले. त्यांचे विशेष स्नेहबंध जुळले ते शिलेदार कुटुंबीयांशी. गाण्याबरोबर जाणारी आणि गायनावर कुरघोडी न करणारी त्यांची तबला साथ आजही रसिकांच्या स्मरणात आहे. या दोन्ही ज्येष्ठ कलावंतांना हे पुरस्कार लवकरच समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी प्रभाकर पणशीकर, श्रीमती विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, प्रा. मधुकर तोरडमल, श्रीमती सुलभा देशपांडे, श्रीमती सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, रामकृष्ण नायक, लीलाधर कांबळी आणि बाबा पार्सेकर यांना प्रदान करण्यात आले आहेत. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी फैय्याज, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, कीर्ती शिलेदार, रजनी जोशी, चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर आणि श्रीमती निर्मला गोगटे यांना प्रदान करण्यात आले आहेत.

Web Title: Jayant Savarkar and Vinayak Thorat were given the state government's Theater Lifetime Achievement Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.