पाटील म्हणे, पुरावे ईडीकड़े सादर
जयश्री पाटील यांचा ईडीने नोंदवला जबाब
अनिल देशमुख यांच्यावरील १०० काेटींच्या वसुलीचा आराेप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटीच्या वसुली आरोप प्रकरणात, बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने ॲड. जयश्री पाटील यांना बोलाविले होते. त्यांच्याकडे चार तास चौकशी करीत जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. त्यांचा जबाब पूर्ण झाला असून, त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात येईल.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप केला होता. याप्रकरणी जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची दखल उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ईडीनेही चौकशी सुरू केली. बुधवारी ईडीने पाटील यांना चौकशीसाठी बोलाविले होते. पाटील सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात दाखल झाल्या. यावेळी सुमारे चार तास चौकशी नोंदवीत त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
* सर्व पुरावे केले सादर!
पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांना सर्व पुरावे दिले आहेत. यात गुंतलेल्या सर्वांची माहिती ईडीला देण्यात आली आहे. लोकांकडून पैसे गोळा केले जात होते, त्याची माहिती दिली आहे. तसेच आज जबाब पूर्ण झाला नसून मला पुन्हा जबाब नोंदविण्यासाठी बोलाविले जाणार आहे. त्यानुसार त्यांना सहकार्य करण्यात येणार आहे. सध्या अनेकांकडून धमक्याही देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
.....................